'मैं धीरेंद्र शास्त्री बोल रहा हूँ...पती को क्या हुआ है?'; पूजेच्या नावाखाली वृद्धेकडून ३.५५ लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:52 IST2025-10-31T12:51:49+5:302025-10-31T12:52:19+5:30
पतीच्या उपचारासाठी ऑनलाइन साईटद्वारे संपर्क साधल्यानंतर ही फसवणूक करण्यात आली

'मैं धीरेंद्र शास्त्री बोल रहा हूँ...पती को क्या हुआ है?'; पूजेच्या नावाखाली वृद्धेकडून ३.५५ लाख लुटले
मुंबई : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या आवाजात बोलत विलेपार्ले येथील इंदू गांधी (वय ७७) यांची तीन लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या उपचारासाठी ऑनलाइन साईटद्वारे संपर्क साधल्यानंतर ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी २९ ऑक्टोबरला गुन्हा नोंदवला आहे.
विलेपार्ले पूर्व येथे इंदू गांधी आणि त्यांचे पती चंद्रकांत गांधी (८२) राहतात. त्यांचा मुलगा सिंगापूरमध्ये व्यवसाय करत आहे. तर, मुलगी विवाहित असून, बंगळुरूमध्ये स्थायिक आहे. चंद्रकांत हे चार ते पाच वर्षापासून आजाराने त्रस्त आहेत. रुग्णालयात उपचार असले तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. गांधी या युट्यूबवर बागेश्वर धामचे व्हिडीओ पाहत असत. सप्टेंबरमध्ये त्यांनी पतीसह मध्य प्रदेशातील बागेश्वर धामला जाण्याचा निर्णय घेतला, मात्र संपर्क क्रमांक नसल्याने त्यांनी एका वेबसाइटवरून संपर्क क्रमांक मिळवला. कॉल सेंटरशी संवाद साधल्यानंतर त्यांना आशिष शर्मा याने आपल्याला 'गुरुजींना भेटायचे आहे का?' अशी विचारणा केली.
इंदू गांधी या युट्यूबवर बागेश्वर धामचे व्हिडीओ पाहत असत. त्यामुळे तेथे जाण्याची त्यांची इच्छा होती.
वारंवार पैशांची मागणी
शर्मा याने पुन्हा दुपारी फोन करून 'गुरुजी आपसे बात करेंगे, कॉल चालू रखो,' असे सांगितले. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या आवाजात बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या पतीच्या तब्येतीसाठी पूजा करावी लागेल, त्यासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले.
सुरुवातीला एक लाख रुपये मागितल्याने गांधी यांनी मुलाकडून हे पैस घेत पवनकुमार करौलिया याच्या खात्यात ते भरले. मात्र, त्या व्यक्तीने वारंवार व्हॉट्सअप कॉलद्वारे संपर्क साधून गांधी यांच्याकडून एकूण ३.५५ लाख रुपये उकळले.
आईने मुलीला प्रकार सांगताच पोलिसांत तक्रार
२७ ऑक्टोबर रोजी मुलगी बंगळुरूहून मुंबईत आल्यावर आईने तिला हा प्रकार सांगितला. त्यावर मुलीने आईला फसवणूक झाल्याचे सांगत सायबर सेलकडे तक्रार दिली. तसेच विलेपार्ले पोलिसांनाही हकीकत सांगितली.