मी ‘शॉकर मॅन’, धक्का दिला तर तुम्ही विसरणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 05:47 IST2025-02-21T05:46:43+5:302025-02-21T05:47:07+5:30
मुंबईतील कुर्ला आणि कलिना मतदारसंघातील विभाग क्रमांक ६च्या विभागप्रमुखपदी नियुक्ती झाल्यांनतर सोमनाथ सापळे यांनी कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी ठाकरेंची भेट घेतली.

मी ‘शॉकर मॅन’, धक्का दिला तर तुम्ही विसरणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला
मुंबई : जपानमध्ये एक-दोन दिवस भूकंप झाला नाही तर लोकांना आश्चर्य वाटते. सध्या माझी अवस्था तशीच झाली आहे. मी ‘शॉकर मॅन’ आहे, अजून कितीही धक्के दिले तरी आमची वेळ आली तर तुम्हाला जो धक्का देऊ तो अविस्मरणीय असेल, असा टोला उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विरोधकांना लगावला.
मुंबईतील कुर्ला आणि कलिना मतदारसंघातील विभाग क्रमांक ६च्या विभागप्रमुखपदी नियुक्ती झाल्यांनतर सोमनाथ सापळे यांनी कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी ठाकरेंची भेट घेतली. ‘एखादा निर्णय घेतल्यावर नाराजी असते; पण सैनिक म्हटल्यावर शिस्त असतेच. ही लढाई एकट्यादुकट्याची नाही, तर सर्वांची आहे,’ असे ते म्हणाले.
महापालिका निवडणूक एप्रिल-मेमध्ये शक्य?
स्थानिक स्वराज संस्था प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता असल्याने पालिका निवडणूक एप्रिल किंवा मेमध्ये होईल, असे वाटते. विधानसभेतील चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घ्यावी. संघटनात्मक बांधणी करण्याचे दिवस आहेत. त्यामुळे शाखेनुसार दिलेली कामे करावी, असे ठाकरे यांनी सांगितले.
खासदारांची बैठक रद्द
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या खासदारांची शिवसेना भवन येथे बैठक बोलावली होती. मात्र, ही बैठक अचानक रद्द करण्यात आली असून १ मार्चला ही बैठक हाेईल. तर दर मंगळवारी सेनाभवन येथे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुखांची बैठक घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.