‘मलाही ऑफर आल्या, त्यांना मी पळवून लावले’; उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये : राज ठाकरेंचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:55 IST2026-01-02T12:55:18+5:302026-01-02T12:55:39+5:30
शिवतीर्थावर सर्व उमेदवारांचे शर्मिला ठाकरे यांनी औक्षण केले. यानंतर उमेदवारांना मार्गदर्शन करताना मुंबई मराठी माणसाची आहे. तिला व मराठीला वाचविण्यासाठी आपल्याकडे ही शेवटची संधी आहे, असे राज म्हणाले.

‘मलाही ऑफर आल्या, त्यांना मी पळवून लावले’; उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये : राज ठाकरेंचा सल्ला
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत उभ्या राहिलेल्या मनसेच्या ५३ उमेदवारांनी गुरुवारी (दि. १) सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कितीही आमिषे आली तरी त्याला बळी पडू नका. मलाही अनेक ऑफर आल्या होत्या. मात्र, ऑफर देणाऱ्यांना मी पळवून लावले होते. विजयी होण्यासाठी पराक्रमाची पराकाष्ठा करा, असा सल्ला राज यांनी उमेदवारांना दिला.
शिवतीर्थावर सर्व उमेदवारांचे शर्मिला ठाकरे यांनी औक्षण केले. यानंतर उमेदवारांना मार्गदर्शन करताना मुंबई मराठी माणसाची आहे. तिला व मराठीला वाचविण्यासाठी आपल्याकडे ही शेवटची संधी आहे, असे राज म्हणाले.
बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकवून काढा
बोगस मतदान होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक बूथला मनसेचे १० कार्यकर्ते उभे करा. बोगस मतदार सापडला तर त्याला तिथेच फटकवून काढा. निवडणुकीत अनेक ऑफर येतील. पैशाचे आमिष दाखविले जाईल. पण, त्याला बळी न पडता मुंबई वाचवायची आहे हे लक्षात ठेवा, असे राज यांनी सांगितले.