कोरोनामुळे घडी विस्कटली; नवरा-बायकोची भांडणे वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 07:13 AM2021-04-19T07:13:19+5:302021-04-19T07:13:28+5:30

कौटुंबिक न्यायालयात दिवसाला घटस्फोटाची ५० प्रकरणे 

Husband-wife quarrel escalated; divorce cases increased because of coronavirus | कोरोनामुळे घडी विस्कटली; नवरा-बायकोची भांडणे वाढली

कोरोनामुळे घडी विस्कटली; नवरा-बायकोची भांडणे वाढली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुन्हा एकदा कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मुळात कठोर निर्बंधांना सर्वत्र तिलांजली देण्यात येत असली तरी वर्षभरापासून लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांची घडी विस्कटली आहे. विशेषत: आर्थिक चणचण आणि अन्य कारणांमुळे घरात भांड्याला भांडे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा छोट्या-माेठ्या कारणांवरून विकोपाला गेलेले वाद थेट कौटुंबिक न्यायालयातपर्यंत दाखल हाेत असून, येथे दररोज दाखल होणाऱ्या घटस्फोटांच्या प्रकरणांचा आकडा सुमारे ५० वर जाऊन पोहोचला आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लागलेल्या लॉकडाऊमुळे अनेकांचे अनेक स्तरावर नुकसान झाले. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या असून, अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले. अशा आर्थिक आणि मानसिक ताणाचा कुटुंबावर परिणाम होत असून, कौटुंबिक शांतता भंग पावत आहे. सुरुवातीला छोटे वाटणारे वाद कालांतराने विकोपाला जात असून, नवरा-बायकोची झालेली भांडणे थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत आहेत. परिणामी गेल्या वर्षभरासह मागील तीन महिन्यांत मुंबईतल्या कौटुंबिक न्यायालयात दररोज दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या सुमारे ५० एवढी असून विविध कारणांमुळे दिवसागणिक यात वाढच होत आहे.

भारतीय समाजाची विवाह संस्थाच आज धोक्यात आली आहे. एकट्या मुंबई शहरात हजारो जोडपी घटस्फोट घेऊन विभक्त झाली आहेत. तर, तितक्याच जोडप्यांचा निकाल अजून कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळेच भारतीय विवाह संस्था इतकी खिळखिळी होण्याची नेमकी कारणे शोधणे आज क्रमप्राप्त आहे. खरे तर भारतीय विवाह संस्था अशी अधू होण्यामागेही भारतीय विवाह संस्थाच कारणीभूत आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. याचे कारण असे की, भारतीय विवाह संस्थेकडे स्त्री-पुरुष यांच्यातील नातेसंबंधांना सामाजिक प्रतिष्ठा आणि मान्यता मिळवून देणारी संस्था या एकाच दृष्टिकोनातून पाहिले गेले. आजही पाहिले जात आहे.
- वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या
केवळ लॉकडाऊनमुळे समस्या निर्माण होत आहेत. घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे, असे नाही. तर पूर्वीपासूनदेखील असलेल्या अनेक अडचणीदेखील यास कारणीभूत आहेत. घरातील वाद, मतभेद किंवा आणखी काही असो. लॉकडाऊनमध्ये या गोष्टी आणखी चिघळल्या. त्यात लॉकडाऊनमध्ये वर्क फॉर्म होम सुरू असल्याने नवरा-बायको दोन्ही २४ तास घरात राहू लागले. त्यात वादात वाढ होऊ लागली. लॉकडाऊनमुळे प्रकरणे आणखी चिघळली. लॉकडाऊन लागल्यापासून अडचणी निर्माण होत आहेत. आर्थिक, कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयांत दररोज घटस्फोटांची ५० प्रकरणे दाखल होत आहेत.
- परेश देसाई, विधितज्ज्ञ, 
कौटुंबिक न्यायालय


मुंबईसाठी केवळ ७ कोर्ट
सर्वसाधारणरीत्या कौटुंबिक न्यायालयात दररोज घटस्फोटाची सुमारे ५० प्रकरणे दाखल होतात. लॉकडाऊनच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल ते ऑगस्टदरम्यान कमी प्रकरणे दाखल करून घेतली जात होती. ऑनलाइनची देखील व्यवस्था करण्यात आली होती. मात्र प्रकरणे ऑनलाइन दाखल होत नव्हती. यात कदाचित तांत्रिक अडचणी असतील. परिणामी टोकन घेऊन प्रकरणे दाखल करण्यात येऊ लागली. मात्र तेव्हा आकडा १५ आणि ३० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आला. त्यामुळे अनेक प्रकरणे दाखल झाली नाहीत.
जेव्हा पुन्हा प्रकरणे दाखल करण्यासाठीची व्यवस्था त्याच वेगाने सुरू झाली तेव्हा हा आकडा दिवसाला सुमारे ७० पर्यंत गेला. ही संख्या सुरुवातीला ३० होती. पण जेव्हा मोठ्या संख्येने प्रकरणे दाखल झाली तेव्हा मात्र कर्मचारी वर्गावरचा ताण वाढत गेला. प्रकरणे दाखल झाली तरी त्याचा निकाल लागण्यास वेळ लागतो. आता लॉकडाऊनमुळे ८ दिवसांची रजा होती. रजा संपली की पुन्हा प्रकरणे दाखल करण्यासाठी गर्दी होणार. न्यायालयावर ताण वाढतो. मुंबईसाठी केवळ ७ कोर्ट दिली आहेत. कोटा वाढविण्याची गरज आहे. आठवे कोर्ट सुरू करायला हवे. 

Web Title: Husband-wife quarrel escalated; divorce cases increased because of coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.