Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीकडून नातलगाचाच चाकू भोसकून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 19:42 IST

खूनानंतर आरोपीने पोलिस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केले.

मीरारोड - अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाने त्याच्या नातलगास घरी बोलवून चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर आरोपीने स्वतः नवघर पोलिस ठाण्यात हजर होऊन हत्येची कबुली दिली.

भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क भागातील ओस्तवाल पार्क- सीमध्ये मयूर सिद्धार्थ तांबे ( ३२ ) हा कुटुंबासह राहतो. मयूरला त्याच्या पत्नीचे त्याच्या आत्ये बहिणीचा पती असलेल्या प्रशांत चिटीयाल( ३१ ) शी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातूनच मयूरने काल बुधवारी त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याने ती कालच घरातून निघून गेली होती असे सूत्रांनी सांगितले.  

आज गुरुवारी सकाळी मयूरने प्रशांतला स्वतःच्या घरी बोलवून घेतले होते. प्रशांत घरी आल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर आधीच तयारीत असलेल्या मयूरने चाकूने प्रशांतच्या पोटात, छातीत व पाठीत चाकूने अनेक वार करुन भोकसून हत्या केली. खून केल्यानंतर मयूर हा स्वतःच नवघर पोलिस ठाण्यात हजर झाला.

पोलिसांनी त्याला अटक करुन ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे हे अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस