क्रिप्टो करन्सी फ्रॉडसाठी मानवी तस्करी! विमानतळावर एंजटसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:48 IST2025-05-27T06:48:20+5:302025-05-27T06:48:31+5:30

मानवी तस्करीप्रकरणी सहार पोलिसांनी दाखल केला गुन्हा

Human trafficking for cryptocurrency fraud Three arrested at airport including an agent | क्रिप्टो करन्सी फ्रॉडसाठी मानवी तस्करी! विमानतळावर एंजटसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

क्रिप्टो करन्सी फ्रॉडसाठी मानवी तस्करी! विमानतळावर एंजटसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : परदेशातील नागरिकांना फेसबुक चॅटिंगमार्फत क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करायला सांगून त्यांची फसवणूक करण्याच्या कामासाठी दोघांना व्हिएतनामला नेणाऱ्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवण्यात आले. या मानवी तस्करीप्रकरणी सहार पोलिसांनी पार्थकुमार चौहान (२९) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी दीपचंद सिंह २५ मे रोजी काउंटरवर तपासणी करत असताना चौहान तेथे आला. त्याच्यासोबत यश प्रजापती (२१) हा प्रवासीही होता. दोघेही व्हिएतनामला जात असल्याचे त्यांच्या बोर्डिंग पासवरून लक्षात आले. मात्र संशय आल्याने सिंह यांनी सदर ठिकाणी जाण्याच्या हेतूबाबत विचारणा केली असता त्यांना ठोस उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्या दोघांची अधिक चौकशी करण्यासाठी सिंह यांनी वरिष्ठांना विनंती केली.

चॅटींगद्वारे फसवणुकीचे रॅकेट

अरुण जिजाला (२०) हा प्रवासीही व्हिएतनामला जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचाही अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्या तिघांची एकत्र चौकशी केली. 

तेव्हा चौहानने १५ डिसेंबर २०२२ ते २३ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत दुबईमधील एका एजंटच्या माध्यमातून व्हिएतनामला जाऊन चॅटिंग स्कॅमसाठी काम केल्याची कबुली दिली. 

त्यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथील नागरिकांशी फेसबुक चॅटिंगच्या माध्यमातून संपर्क साधत त्यांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करायला लावायचे आणि त्यानंतर त्यांची फसवणूक करायची, अशी त्यांची कार्यपद्धती होती. 

याच कामासाठी प्रजापती आणि जिजाला यांना देखील व्हिएतनामला घेऊन निघाला होता, अशी कबुली चौहानने दिली. 

संगणकावर काम, ७० हजार पगार!

चौहान याने प्रजापती आणि जिजाला यांना परदेशात कम्प्युटरवर काम करण्याची नोकरी देतो आणि त्यासाठी महिना ६० ते ७० हजार रुपये पगार मिळेल, असे आमिष दाखवले होते. 

त्यानुसार हे दोघे त्याच्यासोबत जायला तयार झाले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. तिघेही सुरतचे राहणारे असून अशाप्रकारे अन्य कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबतही पोलिस तपास करत आहेत.
 

Web Title: Human trafficking for cryptocurrency fraud Three arrested at airport including an agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.