विमानातून मानवी तस्करी? २७६ प्रवाशांची चौकशी; पहाटे ४ वाजता फ्रान्सवरून विमान दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 06:09 AM2023-12-27T06:09:54+5:302023-12-27T06:10:17+5:30

मुंबईत दाखल झालेल्या २७६ प्रवाशांमध्ये ११ लहान मुलांचा समावेश आहे.

human trafficking by plane and investigation of 276 passengers on flights arrived in mumbai from france | विमानातून मानवी तस्करी? २७६ प्रवाशांची चौकशी; पहाटे ४ वाजता फ्रान्सवरून विमान दाखल

विमानातून मानवी तस्करी? २७६ प्रवाशांची चौकशी; पहाटे ४ वाजता फ्रान्सवरून विमान दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मानवी तस्करीच्या संशयावरून चार दिवस फ्रान्समध्ये रोखून धरण्यात आलेले विमान अखेर फ्रान्स सरकारने मुक्त केले असून सोमवारी पहाटे चार वाजता हे विमान २७६ प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाले. या विमानातील २५ प्रवाशांनी फ्रान्स सरकारकडे आश्रय मागितला असून त्याला तेथील सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर या २५ जणांतील दोघांना साक्षीदार बनविण्यात आले आहे. 

मुंबईत दाखल झालेल्या २७६ प्रवाशांमध्ये ११ लहान मुलांचा समावेश आहे. मुंबईत परतलेल्या या प्रवाशांची विमानतळावर इमिग्रेशन विभाग तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) चौकशी करत त्यांना सोडून दिल्याची माहिती आहे. सकाळी साडेआठच्या दरम्यान हे प्रवासी मुंबई विमानतळावरून बाहेर पडले. 

दुबई येथून गेल्या आठवड्यात लिजेंड एअरलाईन या रोमानियातील चार्टर कंपनीचे एक विमान ३०३ प्रवाशांना घेऊन मध्य अमेरिकेतील निकाग्वारा येथे निघाले होते. हे विमान फ्रान्सच्या वॅटी विमानतळावर इंधन भरण्यासाठी उतरले होते. दरम्यान, या विमानातून मानवी तस्करी होत असल्याची माहिती फ्रान्स सरकारच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी हे विमान चार दिवस रोखून धरले होते. फ्रान्स पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने या प्रवाशांची चौकशी सुरू केली होती. गेले चार दिवस ही चौकशी सुरू होती. 

मुंबईत परतलेल्या या २७६ प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी हे पंजाब, हरियाणा व गुजरात येथील असल्याचे समजते. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे केवळ एक किंवा दोनच लहान बॅग असल्याचे आढळून आले. त्यामुळेच या तस्करीचा संशय अधिक बळावला. मुंबई विमानतळावर चौकशीअंती त्या लोकांना पुन्हा त्यांच्या मूळ राज्यात व घरी जाण्याची अनुमती देण्यात आली. मात्र, एकाही प्रवाशाने मीडियाशी संवाद साधला नाही. 

केंद्र सरकारने मानले आभार

गेल्या चार दिवसांत या विमानात असलेल्या प्रवाशांची देखभाल केल्याबद्दल तसेच भारतीय प्रवाशांना सुखरूप सोडल्याबद्दल भारत सरकारच्या परदेशी दूतावासाने तेथील सरकारचे आभार मानले आहेत.

निकाग्वाराचे कनेक्शन काय आहे ?

निकाग्वारा हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. अमेरिका किंवा कॅनडामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करण्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. त्यामुळेच इथे हे विशेष विमान चालले असल्यामुळे संशय बळावला. या विमानातील काही प्रवाशांनी भारतात परतण्यास नकार दिल्याची माहिती लिजंड एअरलाईनच्या प्रवक्त्याने दिली. तसेच, आमच्या मार्फत कोणतीही मानवी तस्करी झाली नसल्याचाही खुलासा केला आहे. दरम्यान, २०२३ या वर्षात ९६,९१७ भारतीयांनी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेशाचा प्रयत्न केला आहे.
 

Web Title: human trafficking by plane and investigation of 276 passengers on flights arrived in mumbai from france

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.