Join us  

महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देणार? अमित शहांचं मिश्कील उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 5:12 PM

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी शिवसेनेला फक्त ५० जागा देण्याचं विधान केलं होतं. 

मुंबई - राज्यातील शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिवसेनेचे ४० आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, शिवसेनेला किती जागा देण्यात येतील, याबद्दल अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गृहमंत्री अमित शहा यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनीही स्पष्टपणे उत्तर देणे टाळले. तर, काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी शिवसेनेला फक्त ५० जागा देण्याचं विधान केलं होतं. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला ५० जागा देण्यासंदर्भात भाषण दिल्यानंतर शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. शिवसेना नेत्यांनी तो बावनकुळेंच्या अधिपत्याखालील विषयच नसल्याची टीका केली. जागावाटपाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील, असा सूरही यावेळी शिवसेनेकडून निघाला होता. तर, भाजपने हा विषय जागेवरच थांबवण्याचा प्रयत्न केला. आता, मिशन गुवाहटीचे चाणक्य समजले जाणाऱ्या गृहमंत्री अमित शहांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी पत्रकारालाच मध्ये घेत मिश्कील उत्तर दिले. 

एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. निवडणूक आयोगानेही त्यांनाच धनुष्य-बाण हे चिन्ह दिलंय. दोन्ही पक्षांची युती असून आगामी निवडणुकाही भाजप आणि शिवसेना यांच्यातच होतील, असे अमित शहांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपात सामिल करुन घेण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, तसा विचारही अजिबात नाही, असे म्हणत शहा यांनी शिवसेना स्वतंत्र असल्याचे सांगितले. 

जागावाटपाबाबत काय म्हणाले अमित शहा

महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटपाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवू, हा मोठा विषय नाही. गजर पडली तर तुम्हालाही बोलवू असा मिश्किल टोलाही अमित शहा यांनी पत्रकाराला लगावला, त्यावर एकच हशा पिकला.

टॅग्स :अमित शाहशिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे