महायुतीच्या काळात किती उद्योग सुरू झाले? सरकारने श्वेतपत्रिका काढावी - अमित देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 09:26 IST2025-03-13T09:25:26+5:302025-03-13T09:26:06+5:30
अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट जास्त

महायुतीच्या काळात किती उद्योग सुरू झाले? सरकारने श्वेतपत्रिका काढावी - अमित देशमुख
मुंबई : राज्यात २०१४ पासून २०२५ पर्यंत महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे सोडली तर साडेसात वर्षे महायुतीचे सरकार आहे. यावर्षी राज्य सरकारने १६ लाख कोटीच्या गुंतवणुकीचे करार केले. हे करार होतात, पण ते प्रत्यक्ष अंमलात येत नाहीत. त्यामुळे सरकारने याबाबत एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना देशमुख म्हणाले की, श्वेतपत्रिकेत किती करार झाले, त्यातील गुंतवणूक किती होती, किती उद्योग प्रत्यक्षात उभे राहिले, त्यातून किती नोकऱ्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे दरडोई उत्पन्न किती वाढले याची श्वेतपत्रिका काढावी.
वाढवण बंदर हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा देशातील सर्वांत मोठा आणि जास्त गुंतवणुकीचा प्रकल्प असल्याचे सरकारने संबोधले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारत आहे. हा प्रकल्प सरकारीच राहणार आहे की खासगी होणार आहे, असा सवालही देशमुख यांनी विचारला.
अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट जास्त
या अर्थसंकल्पात अजित पवारांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट जास्त असल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असा खोचक टोलाही देशमुख यांनी लगावला.
भाजपकडे जी खाती आहे त्यासाठी ८९,१२८ कोटी, शिंदेसेनेकडे असलेल्या खात्यांसाठी , ४१,६०६ कोटी, अजित पवार गटाच्या खात्यांसाठी, ५६,५६३ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे अमित देशमुख म्हणाले.