Join us  

'राज्याचे छत्रपती किती दिवस भाजपात राहतात, हेच पाहायचंय'  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 5:33 PM

खासदार उदयनराजे भोसेल यांनी गुरुवारी पुण्यातील शरद पवार यांच्या मोदीबाग या निवासस्थानी पवार यांची भेट घेतली.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजापात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दु:ख झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनीही उदयनराजेंच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, महाराजांचा स्वभाव, त्यांची जनतेप्रती असलेली तळमळ आणि प्रश्न सोडविण्यासाठी ते घेत असलेली भूमिका पाहता महाराज किती दिवस भाजपात राहतात हेच पाहायचंय, असे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. 

खासदार उदयनराजे भोसेल यांनी गुरुवारी पुण्यातील शरद पवार यांच्या मोदीबाग या निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. त्यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधून उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाचे वृत्त नाकारले होते. उदयनराजे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीला आले होते, असे मुंडेंनी म्हटले होते. मात्र, धनंजय मुंडेंचा हा आशावाद फोल ठरवत, भाजपात प्रवेश करणार असल्याचं उदयनराजेंनी जाहीर केलं आहे. त्यांनंतर, धनंजय मुंडेंनी नाराजीचा सूर उमटवला असून उदयनराजे किती दिवस भाजपात राहतील हेच पाहायचंय? असे म्हटले आहे. 

सिम्बॉयसिस कॉलेजपासूनची माझी आणि महाराजांची मैत्री आहे, ते मला सिनियर होते. कालच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांची जबाबादारी महाराजांवर देण्यात आली होती. त्यासाठीच्या सर्व दौऱ्याची आखणी करण्यात येणार होती. या दौऱ्यासाठी महाराजांनीही होकार दिला होता. मात्र, रात्रीत काय घडलं माहिती नाही, ते भाजपात जाणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यावेळी, मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना माझ्याशी बोलायच नव्हत. त्यामुळे एका कॉमन मित्राकडून निरोप आला की, धनंजयला सांगा की माझा निर्णय झालेला आहे, असे धनंजय मुंडेंनी सांगितले. 

भाजपा आणि सेनेच्या सत्तेमुळे आजची रयत त्रस्त आहे. जीएसटी, मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांसह महाराजांनी पवारसाहेबांशी चर्चा केली. सध्याकाळी काय घडलं मला नाही, महाराजांनी हा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रयतेसाठी लढले, रयतेसाठी लढायच्यावेळेस छत्रपती उदयन महाराजांनी सोबत असायला हवं होतं. मात्र, त्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असेही मुंडेंनी स्पष्ट केलं. दरम्यान, उदयनराजेंनी तीन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही गुप्त बैठक घेत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीत राहणार की भाजपात जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर, धनंजय मुंडेंनी भाजपावर आरोप करत उदयनराजेंच्या पक्षांतराचे वृत्त फेटाळले होते. तसेच, शिवस्वराज्य यात्रेला हजर नसण्याचे कारण हे वैयक्तिक असून त्यांच्यामागे व्यापक काम होते, असेही मुंडेंनी म्हटले होते. मात्र, मुंडेंना आज आपली शब्द फिरवावे लागले आहेत.  

टॅग्स :उदयनराजे भोसलेधनंजय मुंडेभाजपादेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार