Join us

एकनाथ शिंदे यांचे मन कसे वळविले?; स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 06:16 IST

उपमुख्यमंत्रिपद  स्वीकारण्याबाबत एकनाथ शिंदे यांचे मन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसे वळविले याबाबत आता स्वतः फडणवीस यांनीच माहिती दिली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्रिपद  स्वीकारण्याबाबत एकनाथ शिंदे यांचे मन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसे वळविले याबाबत आता स्वतः फडणवीस यांनीच माहिती दिली आहे. मी त्यांना माझे स्वतःचे उदाहरण दिले, असेही फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

फडणवीस म्हणाले की, मी आधी मुख्यमंत्री होतो, पण शिंदे यांना मुख्यमंत्री केले तेव्हा मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. आधी मी त्यासाठी राजी नव्हतो, पण पंतप्रधान त्यासाठी राजी नव्हतो, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला हे पद स्वीकारायला लावले. तेव्हा मला हे पद घ्यायचे नव्हते, पण नंतर अडीच वर्षे सरकारमध्ये राहून मला खूप काही विधायक करता आले, सत्तेच्या बाहेर राहून ते करता आले नसते हे माझ्या लक्षात आले आणि शिंदे यांना मी नेमके हेच सांगितले, असे फडणवीस म्हणाले.

 भावुक राहून होणार नाही, प्रॅक्टिकल होऊन निर्णय घ्या. तुमच्यासारखा मोठा नेता सरकारच्या बाहेर असणे हे सरकारसाठीही चांगले नाही. पक्ष चालला पाहिजे आणि त्याचवेळी सरकारही चालले पाहिजे, असे मी शिंदे यांना सांगितले. त्यांच्या पक्षातील बरेचसे नेते त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा आग्रह धरत होते, पण काहीजण असेही होते की, ते उपमुख्यमंत्रिपद घेऊ नये, असे म्हणत होते. शिंदे यांनी तीन पक्षांच्या समन्वय समितीचे प्रमुखपद स्वीकारावे असे त्यांचे म्हणणे होते, अशी माहितीही फडणवीस यांनी या मुलाखतीत दिली.

हिंदुत्वाचा फायदा

हिंदुत्वाच्या मुद्याचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत नक्कीच फायदा झाला. मात्र, त्याचवेळी प्रति ध्रुवीकरणाचाही फायदा झाला. लोकसभेच्या धुळे मतदारसंघात अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवाराला एक लाख ९० हजार मतांची आघाडी होती, पण शेवटी मालेगावची मतमोजणी झाली आणि काँग्रेस उमेदवाराने इतर सगळीकडची पिछाडी भरून काढत अगदी काही हजाराने विजय मिळविला. यावरून हिंदुत्वाचा मोठा फायदा झाला, असे फडणवीस यांनी एका प्रश्नात सांगितले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेभाजपा