चांदीच्या विटा, रोकड घेऊन घरचा नोकर पसार, ३.२३ लाखांची चोरी, सांताक्रुझ पोलिसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:55 IST2025-11-11T12:39:01+5:302025-11-11T13:55:09+5:30
Mumbai Crime News: लाखो रुपयांच्या चांदीच्या विटा आणि रोख रक्कम घेऊन घरातील नोकर फरार झाल्याचा प्रकार सांताक्रुज पोलिसांच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी घरमालक अमित शाह यांच्या तक्रारीनुसार, नोकर अनिल लखावत याच्यावर तीन लाख २३ हजार रुपयांच्या मुद्देमालाच्या चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चांदीच्या विटा, रोकड घेऊन घरचा नोकर पसार, ३.२३ लाखांची चोरी, सांताक्रुझ पोलिसांत गुन्हा
मुंबई - लाखो रुपयांच्या चांदीच्या विटा आणि रोख रक्कम घेऊन घरातील नोकर फरार झाल्याचा प्रकार सांताक्रुज पोलिसांच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी घरमालक अमित शाह यांच्या तक्रारीनुसार, नोकर अनिल लखावत याच्यावर तीन लाख २३ हजार रुपयांच्या मुद्देमालाच्या चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार शाह हे सांताक्रुझ पश्चिमेकडील हॅमिल्टन कोर्ट परिसरात आई, पत्नी आणि मुलांसह राहतात. २०२३ मध्ये त्यांनी लखावत याला घरकामासाठी ठेवले होते. त्याला घरात कुठे काय आहे, याबाबत माहीत होते. शाह यांच्या आई-वडिलांनी बचतीमधील साडेचार लाख रुपये खर्च करून १२ किलो वजनाच्या चांदीच्या विटा खरेदी केल्या होत्या. या विटा आईच्या बेडरूममधील कपाटात ठेवल्या होत्या. शाह आईला दरमहा २५ हजार रुपये खर्चासाठी देत असत. त्यातील उर्वरित रक्कम त्या कपाटात ठेवायच्या. या सर्व गोष्टींची माहिती लखावत याला होती.
आईचा संशय ठरला खरा
ऑगस्ट २०२५ मध्ये शाह यांनी आईला एक लाख ६० हजार रुपये दिले होते, ती रक्कमही त्यांनी कपाटात ठेवली होती. ५ ऑक्टोबरला आईने शाह यांना कपाटातील चांदीच्या विटा आणि रोख रकमेबाबत संशय असल्याचे सांगितले. त्यानंतर कपाटातून काही विटा आणि रोख रक्कम मिळून एकूण तीन लाख २३ हजार २५० रुपयांचा मुद्देमालाची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
अनिल हा मूळचा आंध्र प्रदेशातील आदिलाबादचा रहिवासी असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.