आता घरगुती गॅस सिलिंडर वापरणारे हॉटेलमालक पोलिसांच्या 'रडार'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 09:05 IST2026-03-30T09:05:40+5:302026-03-30T09:05:40+5:30

अवैध गॅस सिलिंडर आढळल्याने गुन्हे दाखल : अनेक हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई सुरूच

Hotel owners using domestic gas cylinders are on the police radar | आता घरगुती गॅस सिलिंडर वापरणारे हॉटेलमालक पोलिसांच्या 'रडार'वर

आता घरगुती गॅस सिलिंडर वापरणारे हॉटेलमालक पोलिसांच्या 'रडार'वर

मुंबई : घरगुती गॅस सिलिंडर काळ्या बाजारात मिळवून धंदा सुरू ठेवणारी हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर असून अशा हॉटेलमालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. जोगेश्वरी येथील एका हॉटेल मालकावर पोलिसांनी कारवाई केली असून, त्याच्याकडून एकूण १० घरगुती व व्यावसायिक सिलिंडर व २ रेग्युलेटर जप्त केले आहेत.

घरगुती गॅस सिलिंडर अनेक दिवस मिळत नसल्याने आणि ऑनलाइन बुकिंगमध्ये अडचणी येत असल्याने ग्राहक वैतागलेले आहेत. सिलिंडर मिळविण्यासाठी गॅस एजन्सीबाहेर दररोज सिलिंडर घेऊन ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सिलिंडर टंचाईचा गैरफायदा घेऊन घरगुती गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात दोन ते पाच हजार रुपयांना विक्री होत आहे.

व्यवसायासाठी खटाटोप 

व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेलमालक, चहाचे स्टॉलवाले घरगुती गॅस सिलिंडर घेऊन व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आदेश दिल्याने आता पोलिसांनी घरगुती गॅस सिलिंडर अवैधपणे वापरणाऱ्या हॉटेलमालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

जोगेश्वरीत १० सिलिंडर, दोन रेग्युलेटर जप्त

जोगेश्वरीतील एस. व्ही. रोडवरील हॉटेलमध्ये अवैधरीत्या गॅस सिलिंडरचा साठा असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांसह या हॉटेलवर २५ मार्चला दुपारी ४ वाजता छापा टाकला. १४.२ किलो वजनाचे ४ भरलेले घरगुती गॅस सिलिंडर, १ रिकामा सिलिंडर तसेच १९ किलो वजनाचे ५ रिकामे व्यावसायिक सिलिंडर आणि २ गॅस रेग्युलेटर असा एकूण १२ वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किंमत ३२ हजार रुपये इतकी आहे. या गॅस साठ्याबाबत हॉटेलमालकाकडे कागदपत्रे आढळली नाहीत.

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्याने शिधावाटप अधिकारी हरीश पटेल यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक वाहिद अमीन अतारविरुद्ध आंबोली पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशाच प्रकारे मुंबईतील विविध हॉटेल चालक पोलिसांच्या रडारवर आहेत.

चोरीला गेलेल्या २७ सिलिंडरचा शोध सुरू 

चारकोपमधील श्रीजी गॅस एजन्सीचे २७ सिलिंडर टेम्पो फोडून २६ मार्चला चोरण्यात आले. त्या चोरीचा छडा अद्याप लागलेला नसून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title : घरेलू गैस सिलेंडर इस्तेमाल करने वाले होटल पुलिस रडार पर

Web Summary : मुंबई पुलिस ने अवैध रूप से घरेलू गैस का उपयोग करने वाले होटलों को निशाना बनाया। जोगेश्वरी में छापे, सिलेंडर, नियामक जब्त। कमी के बीच काला बाजार फलफूल रहा है, दुरुपयोग पर नकेल।

Web Title : Hotels Using Domestic Gas Cylinders Under Police Scanner

Web Summary : Mumbai police target hotels using domestic gas illegally. Raids in Jogeshwari seized cylinders, regulators. Black market thrives amid shortages, prompting crackdowns on misuse.