मालाडमध्ये भीषण अपघात: ट्रेलरला दुचाकी धडकली, दोन १८ वर्षीय तरुणांचा करुण अंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:54 IST2025-12-19T12:52:47+5:302025-12-19T12:54:07+5:30
ट्रेलरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात अलिसिया फर्नाडिस (१८) आणि रिडज डिसोजा (१८, रा. दोघेही मालाड) यांचा मृत्यू झाल्याची घटना मालाड पश्चिमेतील एव्हरशाइननगर परिसरात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

मालाडमध्ये भीषण अपघात: ट्रेलरला दुचाकी धडकली, दोन १८ वर्षीय तरुणांचा करुण अंत!
मुंबई : ट्रेलरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात अलिसिया फर्नाडिस (१८) आणि रिडज डिसोजा (१८, रा. दोघेही मालाड) यांचा मृत्यू झाल्याची घटना मालाड पश्चिमेतील एव्हरशाइननगर परिसरात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला.
बांगूरनगर लिंक रोड पोलिस ठाण्यातील शिपाई विलास तांडेल हे रात्री गस्त घालत असताना त्यांना या अपघाताची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाकडून मिळाली. ते घटनास्थळी पोहोचले असता एव्हरशाइन नगरमधील तिरुमाला अपार्टमेंटजवळ रस्त्याच्या बाजूला ट्रेलरमागे अपघातग्रस्त दुचाकी आढळली. अलिसिया फर्नाडिस आणि रिडज डिसोजा यांचे डोके व गळ्याला दुखापत झाल्याने रक्तस्राव झाला.
ट्रेलरमुळे रहदारीस अडथळा
स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जखमींना प्रथम खासगी नर्सिंग होममध्ये आणि तिथून पुढे खासगी रुग्णवाहिकेतून जोगेश्वरी पूर्वेकडील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
दोघांनाही डॉक्टरांनी ११:५०च्या सुमारास दाखलपूर्व मृत घोषित केले. प्राथमिक तपासानुसार, ट्रेलर चालकाने रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन उभे केल्याने हा अपघात झाल्याचा संशय आहे.