Join us

हॉर्नचा आवाज बेतला दोघांच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 03:57 IST

देवनारमधील घटना; आईसह ११ महिन्यांच्या बाळाचा डम्परखाली चिरडून मृत्यू

मुंबई : हॉर्नचा आवाज दोघांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी देवनारमध्ये घडली. पत्नी आणि ११ महिन्यांच्या बाळासह दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या जोराच्या हॉर्नच्या आवाजाने ते अख्खे कुटुंब दचकले. पुढ्यातील खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी घसरली. पत्नी आणि बाळ डम्परच्या चाकाखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवनार पोलिसांनी डंपर चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.कांजूरच्या कर्वेनगर परिसरात प्रमोद बाळकृष्ण घडशी (३२) हे पत्नी पूजा (२९) आणि ११ महिन्यांचा मुलगा समर्थसोबत राहायचे. घडशी यांचे मानखुर्दला स्वत:च्या मालकीचे घर आहे. दोघेही नोकरीला असल्याने मुलाच्या देखरेखीसाठी कांजूरला पूजाच्या माहेरी राहायचे. त्यांनी दिवाळीनिमित्त नवीन कार बुक केली. कारसाठी त्यांनी घरावर कर्ज घेतले. शनिवारी व्हेरीफिकेशनसाठी बँकेतून कर्मचारी येणार असल्याने ते मानखुर्दच्या घरी गेले होते. व्हेरीफिकेशन झाल्यानंतर शनिवारी दुपारी १ च्या सुमारास ते पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून महाराष्ट्र घाटकोपर लिंक रोडवरून कांजूरकडे येण्यास निघाले. याच दरम्यान त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या डम्पर चालकाने अचानक जोरजोरात हॉर्न वाजविण्यास सुरुवात केली. यामुळे घडशी दचकले आणि पुढ्यातील खड्डा टाळण्याच्या नादात त्यांची दुचाकी घसरली. पत्नी आणि मुलगा डम्परच्या चाकाखाली गेले. चालकाने मदत न करता तेथून पळ काढला. घटनास्थळी दाखल पोलिसांनी तिघांना रुग्णालयात नेले. तेथे पत्नी आणि मुलाला मृत घोषित केले.

टॅग्स :अपघातमृत्यूमुंबई