Home sales in Mumbai fall by 80 per cent | मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीत ८० टक्क्यांची घट

मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीत ८० टक्क्यांची घट

मुंबई : कोरोनामुळे लागू झालेले लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीमुळे मुंबईतीलघरांच्या खरेदी-विक्रीचा डोलारा डळमळीत झाला आहे. २०१९च्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यांत फक्त तीन टक्के घरांची विक्री झाली होती. जून आणि जुलै महिन्यांत तो टक्का अनुक्रमे ३६ आणि ४६ असा वाढला आहे. मुंबईतील गृहखरेदीला चालना मिळत असल्याचे दिसत असले तरी ती गतवर्षीच्या तुलनेत नगण्य म्हणजेच अवघी २० टक्के असल्याचे आकडेवारी सांगते.

देशात बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांतील निम्मे बांधकाम महाराष्ट्रात सुरू आहे. तर महाराष्ट्रातील बांधकामापैकी जवळपास ४० टक्के प्रकल्प हे मुंबई महानगर क्षेत्रातले आहेत. या परिसरातला गृहनिर्माणाचा वेग प्रचंड आहे. मात्र, कोरोना दाखल होण्यापूर्वीच डळमळीत झालेले मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीचे गणित कोरोनानंतर पुरते बिघडले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील व्यवहारांनी या क्षेत्रात थोडेफार दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ५ हजार ७४८ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मुद्रांक शुल्क कार्यालयात नोंदविले गेले होते. यंदा ती संख्या २६६३ इतकी (४६ टक्के) आहे. परंतु, एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ते प्रमाण जास्त आहे. किंबहुना या तीन महिन्यांतील एकूण विक्रीपेक्षा जुलै महिन्यातील व्यवहारांची संख्या जास्त आहे. आॅगस्ट महिन्यात त्यात आणखी भर पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी या चार महिन्यांत मुंबईत २३ हजार ५९८ घरांची विक्री झाली होती. यंदा ती संख्या फक्त ४
हजार ९०७ इतकीच (२० टक्के) आहे. तर, गतवर्षी या व्यवहारांपोटी १८९७ कोटींचा महसूल देणाऱ्या मुंबईने यंदा सरकारी तिजोरीत फक्त ३८३ कोटी जमा केले आहेत. घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत असली तरी उर्वरित ८ महिन्यांत गतवर्षीच्या ५० टक्के मजलही यंदा मारता येईल की नाही अशी भीती बांधकाम व्यावसायिकांना वाटत आहे.

महाराष्ट्र मुंबईच्या पुढे
गेल्या चार महिन्यांत मुंबईतले मालमत्ता व्यवहार जेमतेम २० टक्क्यांपर्यंत पोहोचत असताना राज्यातील व्यवहारांनी ४१ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.
मात्र, त्या तुलनेत प्राप्त झालेला महसूल फक्त २६ टक्के आहे. कमी किंमत असलेल्या मालमत्तांचे व्यवहार वाढल्याचे त्यातून अधोरेखित होते. गेल्या वर्षी पहिल्या ४,५५,८३३ मालमत्तांच्या नोंदणीतून ६,४५७ कोटी रुपये मिळाले होते. यंदा १,८९,८०१ व्यवहार झाले असून, मुद्रांक शुल्काची रक्कम १,७०३ कोटी आहे. मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रात दिलेल्या एक टक्का मुद्रांक शुल्क सवलतीमुळेही काही घट झाल्याचे सांगण्यात आले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Home sales in Mumbai fall by 80 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.