Join us  

गृह खरेदी वाढली ; सरकारी महसूल घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 6:37 PM

Home purchases increased : दसरा दिवाळीच्या मुहुर्तावर मालमत्तांच्या खरेदीला वेग

विकासकांच्या सवलती आणि मुद्रांक शुल्क कपात पथ्यावर  

मुंबई : कोरोच्या वाढत्या संक्रमणामुळे कोसळलेले मुंबई शहरांतील मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार राज्य सरकारने केलेली मुद्रांक शुल्कातील कपात आणि विकासकांकडून दिल्या गेलेल्या सवलतींमुळे वधारले आहेत. २०१९ च्या तुलनेत २०२० सालातील सप्टेंबर महिन्यांत चक्क जास्त  व्यवहारांची दस्त नोंदणी झाली होती. दसरा दिवाळीच्या या शुभ मुहुर्तांवर ही खरेदी उच्चांक गाठण्याची चिन्हे आहेत. दस्त नोंदणी वाढली असली तरी मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे सरकारच्या तिजोरीतील महसूलात मात्र लक्षणीय घट झाली आहे.      

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लाँकडाऊन जाहिर झाल्यानंतर एप्रिल महिन्यांत मुंबईत एकही दस्त नोंदणी झाली नव्हती. मे महिन्यांत जेमतेम २०७ व्यवहार झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या व्यवहारांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. सप्टेंबर महिन्यांत तब्बल ५ हजार ५९७ मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मुंबईत झाले आहेत. त्यात नव्या जुन्या घरांसह, जमीन, गोडाऊन, व्यावसायिक मालमत्तांचाही समावेश आहे. कोरोना संकटामुळे बांधकाम व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. भविष्यात घरांची खरेदी विक्री पुन्हा पूर्वपदावर येईल की तो डोलारा दीर्घ काळासाठी कोसळून पडेल याबाबत अनिश्चितता होती. परंतु, उत्सव काळाच्या पार्श्वभूमीवर घरांच्या खरेदी विक्रीला चालना मिळताना असल्याने बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारला या दस्त नोंदणीतून वर्षाअखेरीस ३० हजार कोटींचा महसूल मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, सहा महिन्यांत फक्त ५ हजार ४०० कोटी रुपये प्राप्त झाले असून पुढील सहा महिने सवलतींचे आहे. त्यामुळे व्यवहार वाढले तरी महसूल एका मर्यादेपेक्षा जास्त वाढणार नाही असे मत मुद्रांक शुल्क विभागातील अधिका-यांनी व्यक्त केले आहे.   

 

कोरोनामुळे सुरक्षित घराचे महत्व सर्वांनाच पटले आहे. त्यामुळे भाडेतत्वावरील घरांमध्ये राहणारी कुटंब स्वतःच्या मालकीचे तर घर खरेदी करू इच्छितात. स्वतःचे घर असलेली मंडळी आणखी मोठ्या घर खरेदीच्या प्रयत्नात आहे. गृह कर्जांच्या व्याज दरांमध्ये अभूतपुर्व कपात झाली असून घरांचे विविध पर्यायही उपलब्ध आहेत. अनेक अनिवासी भारतीय गृह खरेदीच्या प्रयत्नात असल्याने या व्यवहारांत नक्कीच वाढ होईल.  

-    निरंजन हिरानंदानी , राष्ट्रीय अध्यक्ष, नरेडको  

 

सरकारने दिलेली मुद्रांक शुल्कातील कपात आणि विकासकांकडून दिली जाणारी घसघशीत सवलत ही ‘वन्स इन अ लाईफ टाईम’ संधी असून ती पुन्हा कधीही मिळणार नाही. त्यामुळे डिसेंबरपूर्वीच्या उत्सव काळात अनेक कुटुंब आपले गृह खरेदीचे स्वप्न साकार करतील. गेल्या सहा महिन्यांत रखडलेले व्यवहारही या कालावधीत मार्गी लागतील. त्यामुळे या व्यवहारांमध्ये विक्रमी वाढ होईल.   

-    बोमन इराणी, चेअरमन रुस्तमजी ग्रुप

 

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत उद्दिष्टाच्या ५० टक्के उत्पन्न अपेक्षित असताना ते जेमतेम १८ टक्क्यांपर्यंतच पोहचले होते. मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वाढताना दिसत असले तरी डिसेंबरपर्यंत तीन आणि त्यापुढे मार्च अखेरीपर्यंत मुद्रांक शुल्कात दोन टक्के सवलत जाहीर झाल्यामुळे अपेक्षित महसूल मिळणे अवघड आहे.

-     उदयराज चव्हाण, सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर

मालमत्तांची खरेदी विक्री व्यवहार

महिना

२०१९

२०२०

एप्रिल

५९४०

मे

६२७०

२०७

जून

५६४०

१८३९

जुलै

५७४८

२६६२

आँगस्ट

५८७३

२६४२

सप्टेंबर

४०३२

५५९७

आँक्टोबर

५८११

३५२८

( आँक्टो,२०२० चे आकडे १९ तारखेपर्यंतचे)

सरकारच्या तिजोरीत जमा झालेला महसूल (कोटींमध्ये)

महिना

२०१९

२०२०

एप्रिल

४६०

मे

५३३

१६

जून

४५२

१५३

जुलै

४५२

२१४

आँगस्ट

५००

१७६

सप्टेंबर

३४७

१८०

आँक्टोबर

४४२

१०३

 

( आँक्टो,२०२० चे आकडे १९ तारखेपर्यंतचे)

 

टॅग्स :घरबांधकाम उद्योगकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस