Join us  

गृहमंत्री अन् उपमुख्यमंत्री शरद पवारांना भेटले? संजय राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 2:48 PM

गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देगृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायलयानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या निकालानं राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. तर, विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची आक्रमकपणे मागणी केली आहे. कोर्टाच्या याच निकालावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

"मी सरकारशी संबंधित व्यक्त नाही आणि न्यायालयाशी निगडीत निर्णयावर मी काही बोलणं योग्य ठरणार नाही. कोर्टाचा निर्णय अद्याप माझ्या हातात आलेला नाही. त्यामुळे त्यावर काही प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल. फक्त हायकोर्टाच्या निर्णयाचा सरकार अभ्यास करेल इतकंच मी सांगू शकतो", असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ''मला माहिती नाही, मला माहिती नाही. कारण, हा प्रत्येक पक्षाचा, महाविकास आघाडीतील पक्षाचा अंतर्गत विषय असतो. त्यासंदर्भात कुठे काही घडत असेल, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यानं त्यावर बोलणं योग्य नाही,'' असे राऊत यांनी म्हटलंय. राऊत यांनी बचावात्मक पवित्रा घेत जास्तीचे बोलणे टाळले. 

तपास यंत्रणा परमेश्वराचा अवतार नाहीकोर्टाच्या निर्णयाचा मान आपण आदर राखत आलो आहोत, असं सांगतानाच संजय राऊत यांनी देशातील कोणतीही तपास यंत्रणा ही काही परमेश्वराचा अवतार नाही. काल ममता बॅनर्जी यांनीही केंद्रीय तपास यंत्रणेवर काही आरोप केले आहेत. त्यामुळे कोर्टानं नेमका काय निर्णय दिलाय ते आधी कळूदेत. त्यावर सरकारकडून भूमिका मांडली जाईल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.  

टॅग्स :संजय राऊतअनिल देशमुखशरद पवारअजित पवार