सुरक्षा विषयक १४८२ अस्थायी पदांना मुदतवाढ, गृह विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 20:49 IST2020-03-14T20:40:43+5:302020-03-14T20:49:16+5:30
सर्वाधिक ४११ पदे मुंबईतील

सुरक्षा विषयक १४८२ अस्थायी पदांना मुदतवाढ, गृह विभागाचा निर्णय
मुंबई - राज्यातील विविध अस्थापना व व्यक्तींच्या संरक्षण व सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या १४८२ पदांना पुन्हा सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विविध पोलीस घटकातील ही पदे ३१ आॅगस्ट २०२० पर्यत कार्यरत रहाणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ४११पदे मुंबई आयुक्तालयातील आहेत.
मुदतवाढीच्या प्रस्तावाला गृह विभागाने मंजुरी दिली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या पदाचे वेतन काढण्यासाठी संबंधित घटकांना कोणतीही अडचण येणार नाही. राज्यातील विविध क्षेत्रातील सिलेब्रेटी, उद्योगपती, बिल्डरांना आवश्यकता व गरजेनुसार पोलीस दलातर्फे संरक्षण पुरविले जाते. त्याचप्रमाणे विविध अस्थापनाही सुरक्षा पुरविले जाते. त्यासाठी सरकारने २०१२ मध्ये सुरक्षा विभागामध्ये अस्थायी स्वरुपात पदांना मंजुरी देण्यात आली. आवश्यकतेनुसार त्यामध्ये वेळोवेळी पदांची संख्या वाढविण्यात आली. त्यानुसार राज्यातील सर्व पोलीस घटकामध्ये सध्या एकुण १४८२ पदे कार्यरत आहेत. त्याची मुदत १ मार्च२०२० पर्यंत होती.मात्र या पदाची आवश्यकता असल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढीच्या प्रस्ताव पोलीस मुख्यालयाकडून गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.