मुंबईत धुळवडीला १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 18:28 IST2024-03-26T18:28:05+5:302024-03-26T18:28:22+5:30
उत्साहाच्या भरात भान हरपून घडलेल्या विविध घटनांमध्ये मुंबईत एकूण १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ आली आहे.

मुंबईत धुळवडीला १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ!
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण उत्साहाच्या भरात भान हरपून घडलेल्या विविध घटनांमध्ये मुंबईत एकूण १५० जणांवर रुग्णालयात धाव घेण्याची वेळ आली आहे. परळ येथील केईएम रुग्णालयात धुळवडीच्या दिवशी २१ रुग्ण दाखल झाले. यातील चार जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. त्यातील तीन जणांना डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. तर एकाला ऑर्थोपॅडिक विभागात दाखल करण्यात आलं आहे. केइएम रुग्णालयाचे डीन डॉ. संगीता रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार एक जण व्हेंटिलेटरवर आहे.
नायर रुग्णालयात काल जवळपास १७ रुग्णांची नोंद झाली. यातील ९ जण होळी साजरी करताना पडल्यामुळे जखमी झाले होते. दिवसाअखेर ४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ ओढावली आहे. यातील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर एकाच्या डोळ्याला फुगा मारला गेल्यामुळे दुखापत झाली आहे. तसंच तीन जणांनी रंगांमुळे त्वचेची जळजळ झाल्याची तक्रार केली आहे. यात एका १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. तसंच प्रमाणाच्या बाहेर भांगचं सेवन केल्यामुळे असह्य वाटत असल्याचा एक रुग्ण दाखल झाला आहे.
सायन रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात ३२ रुग्ण दाखल झाले. पण यातील केवळ एक जण गंभीर दुखापत झाल्याचा रुग्ण आहे. तर कूपर रुग्णालयात ८३ रुग्णांची नोंद झाली आहे.