Join us

गणेशोत्सवावेळीच मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'; गणपती मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना भरधाव BMW ने चिरडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 09:07 IST

अपघातानंतर घटनास्थळी नवघर पोलीस दाखल झाले असून कार चालकाचा शोध सुरू आहे.

मनिषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क|

Mumbai Accident ( Marathi News ) : मुंबईतील मुलुंड परिसरात आज पहाटे ४ वाजता एका बीएमडब्ल्यू कार चालकाने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना धडक देत पळ काढला. या घटनेत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. गंभीर जखमी असलेल्या तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे ४ वाजताच्या दरम्यान आकृती टॉवर जवळ  बॅनर लावत होते. अचानक कॅम्पस हॉटेलकडून भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यूने या दोघांना धडक दिली. धडक देऊन कारचालक पसार झाला आहे. या अपघातात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी नवघर पोलीस दाखल झाले असून कार चालकाचा शोध सुरू आहे.

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील वरळी परिसरातही अशीच हिट अँड रनची घटना घडली होती. त्या घटनेत एका कारचालकाने महिलेला फरफटत नेत पळ काढला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :मुलुंडअपघात