'...त्यांचं असं जाणं मनाला न पटणारं'; उद्धव ठाकरेंनी वाहिली नितीन देसाईंना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:19 IST2023-08-02T13:12:55+5:302023-08-02T13:19:10+5:30

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'His going like this is unacceptable'; Uddhav Thackeray paid tribute to Nitin Desai | '...त्यांचं असं जाणं मनाला न पटणारं'; उद्धव ठाकरेंनी वाहिली नितीन देसाईंना श्रद्धांजली

'...त्यांचं असं जाणं मनाला न पटणारं'; उद्धव ठाकरेंनी वाहिली नितीन देसाईंना श्रद्धांजली

मुंबई: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी  कर्जतच्या एन डी स्टुडिओतच आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास केला जात आहे. 

नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे झाला. त्यांनी मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतले. तर 1987 पासून त्यांनी कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली. 1993 साली आलेल्या अधिकारी ब्रदर्सच्या 'भूकंप' सिनेमातून त्यांनी सुरुवात केली. मात्र 1994 साली आलेल्या '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आज 2 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने हा कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुप्रसिध्द कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांच्या आत्महत्येची बातमी धक्कादायक आहे. अनेक मराठी-हिंदी इतिहासकालीन चित्रपट आणि मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शनाचं काम करुन, प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यांची कामातील प्रचंड प्रतिभा अनेक नव्या प्रकल्पांना घडवत होती. त्यांचं असं जाणं मनाला न पटणारं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली  हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य 'एनडी स्टुडिओ' त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके नम' अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. 'देवदास','खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

Web Title: 'His going like this is unacceptable'; Uddhav Thackeray paid tribute to Nitin Desai