हिरेन कुटुंबाची एनआयएच्या पथकाकडून तीन तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 02:41 IST2021-03-12T02:40:36+5:302021-03-12T02:41:04+5:30

ठाणे शहरात दिल्या भेटी : वाझे-मनसुख संबंधाबद्दल घेतली माहिती

The Hiren family was interrogated for three hours by an NIA team | हिरेन कुटुंबाची एनआयएच्या पथकाकडून तीन तास चौकशी

हिरेन कुटुंबाची एनआयएच्या पथकाकडून तीन तास चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई / ठाणे : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटालिया या इमारतीजवळ स्फोटकांची मोटार सापडल्याच्या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने सुरु केला आहे. एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांनी पथकासह मनसुख हिरेन यांच्या कुटुंबाची गुरुवारी तब्बल तीन तास चौकशी केली. त्यानंतर ठाण्यातील इतर काही ठिकाणी जाऊन विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिरेन यांच्या खूनप्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करत आहे. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या अधिपत्याखाली विविध पथकांकडून तो सुरु आहे. बुधवारी या पथकाने मुंब्रा पोलिसांकडून यासंबंधित गुन्ह्याच्या स्टेशन डायरीतील नोंदीही घेतल्या. सध्या हिरेन आणि त्यांच्याशी संबंधितांच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स, स्फोटकांच्या कारमागील अन्य एका इनोव्हा मोटारीचाही शोध या पथकाकडून घेतला जात आहे. 
एनआयएचे १९९५ च्या अ‍ॅगमुट केडर (केंद्रशासित प्रदेश) मधील भारतीय पोलीस सेवेतील विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या नियंत्रणाखालील पथकाकडून स्फोटकांच्या मोटारीच्या संबंधित तपास सुरू आहे. शुक्ला यांच्यासह चार वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील ‘विजय पाम’ या इमारतीत हिरेन यांच्या निवासस्थानी गुरुवारी (११ मार्च) भेट दिली. दरम्यान, दुपारी २.२५ ते सायंकाळी ५.२५ या तीन तासांच्या काळात या अधिकाऱ्यांनी मनसुख यांच्याकडे संबंधित मोटार (स्कॉर्पिओ) कधी दुरुस्तीसाठी आली होती, ती त्यांनी कोणत्या कारणासाठी दुरुस्तीनंतरही त्यांच्याकडे ठेवली होती, मुंबईत १७ फेब्रुवारीला ते कोणत्या कामाकरिता गेले, त्यानंतर त्यांनी विक्रोळी पोलिसांत केलेली तक्रार, १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी गाडी अँटालिया येथे सापडेपर्यंत काय घडले, हिरेन या दरम्यान कोणाच्या व का संपर्कात होते?, सचिन वाझे यांच्याशी त्यांचा कसा संपर्क आला, हिरेन कुटुंबाने कोणत्या कारणांनी वाझेंवर  आरोप केले, याची माहिती घेतली. यावेळी मनसुख यांची पत्नी विमला, मोठा मुलगा मित, इतर कुटुंब उपस्थित होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The Hiren family was interrogated for three hours by an NIA team