Himalaya Pool Accident: Chargesheet filed against Neerajkumar Desai | हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईविरुद्ध आरोपपत्र दाखल
हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईविरुद्ध आरोपपत्र दाखल

मुंबई  - हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या नीरजकुमार देसाईविरुद्ध गुरुवारी आझाद मैदान पोलिसांनी ७०९ पानी आरोपपत्र दाखल केले. चुकीचा अहवाल दिल्यामुळे अपघात झाल्याचा ठपका यात ठेवण्यात आला असून १६४ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
नीरजकुमार देसाई काम पाहत असलेल्या प्रोफेसर डीडी देसाई असोसिएट इंजिनीअरिंग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिस्ट कंपनीकडे पालिकेने मुंबईतील ३९ महत्त्वाच्या पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची जबाबदारी दिली होती. सप्टेंबर, २०१६ मध्ये त्याला याचे काँट्रॅक्ट मिळाले. त्यानंतर उड्डाणपूल, स्कायवॉक, भुयारी मार्ग, रेल्वे मार्गावरील पूल अशा स्वरूपाच्या सर्व प्रकारच्या एकूण ७६ पुलांचे त्याने आॅडिटिंग केले.
त्यापैकी सीएसएमटी पुलाचे त्याने ३ वेळा आॅडिटिंग केले. ‘तो पूल धोकादायक नसून, त्याला किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे,’ असा अहवाल त्याने पालिकेला दिला होता. मात्र १४ मार्चला पूल कोसळला. सीएसएमटी येथील या हिमालय पूल दुर्घटनेत ७ जण ठार तर ३१ जण जखमी झाले. या अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत आझाद मैदान पोलिसांनी देसाईला अटक केली.
देसाईने केलेली तपासणी निकषांनुसार, महापालिकेच्या नियमांनुसार करण्यात आली नव्हती, असेही साक्षीदारांचे जबाब आणि महापालिकेकडील कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नॉन डिस्ट्रक्टिव्ह चाचणीची जबाबदारी देसाई यांनी गुजरातच्या जीओ डायनामिक्स कंपनीला दिली होती. या जीओ डायनामिक्सने ही चाचणी केली तेव्हा देसाई, त्यांच्या कंपनीचे अभियंते किंवा महापालिकेच्या अभियंत्यांपैकी कोणीही घटनास्थळी हजर नव्हते. तसेच तपासणी करताना पुलाखालील वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक असतानाही तसे करण्यात आले नाही.

पालिकेकडे मागितली परवानगी

या प्रकरणात देसाई यांच्यासह पालिकेचे तीन आजी-माजी अभियंते अटकेत आहेत. सेवेत असलेल्या दोन अभियंत्यांविरोधात खटला चालविण्याची परवानगी मागणारा प्रस्तावदेखील पोलिसांनी महापालिकेकडे पाठवला आहे. त्यानुसार, त्यांच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

टॅक्सीचालक, दुकानदार प्रत्यक्षदर्शी
देसाईविरुद्ध दाखल केलेल्या ७०९ पानांच्या आरोपपत्रात १६४ साक्षीदारांचे जबाब आहेत. त्यात प्रत्यक्षदर्शी म्हणून टॅक्सी चालक, पुलाखालील दुकानदाराचा समावेश आहे. तसेच जीओ डायनामिक्स कंपनीचे प्रमुख रवी वैद्य यांचाही जबाब घेण्यात आला आहे.
 

English summary :
CST Bridge Collapse: Azad Maidan police filed 709 chargesheets against Nirajkumar Desai in connection with the Himalaya bridge accident. It's mentioned that due to irresponsible behavior this accident took place and 164 witnesses registered their views.


Web Title: Himalaya Pool Accident: Chargesheet filed against Neerajkumar Desai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.