The highest cost will be incurred on Metro-4 this year | एमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च

एमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो प्रकल्पांच्या कामांवर एमएमआरडीए विद्यमान आर्थिक वर्षात सहा हजार ७३७ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यापैकी सर्वाधिक १,२८७ कोटी रुपये वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ मार्गिकेवर खर्च होईल. त्याखालोखाल १,०२० कोटी रुपये खर्च अंधेरी ते दहिसर या मेट्रो-७ मार्गिकेवर केला जाईल.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या अखत्यारितील विविध प्रकल्पांवर यंदाच्या आर्थिक वर्षात १४ हजार ७४१ कोटी रुपये खर्च होतील, असे अंदाजपत्रक मांडले आहे. त्यात सर्वाधिक खर्च हा मेट्रोमार्गिकांसाठी केला जाईल. त्याखालोखाल सहा हजार ३३१ कोटी अभियांत्रिकी विभागाने हाती घेतलेल्या कामांवर खर्च होतील. त्यात शिवडी न्हावा-शेवा जलसेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश असून, त्यावर यंदा २,९०० कोटी खर्च होतील, असा अंदाज आहे. याच विभागांतर्गत अलिबाग-विरार मल्टिमोडल कॉरिडोरचे काम केले जाणार होते. त्याच्या भूसंपादनासाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद असली, तरी हे काम आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने हा निधी 
खर्च होणार नाही. त्या मोबदल्यात ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग एमएमआरडीएकडे सोपविला असला, तरी त्यासाठी भूसंपादन करावे लागणार नसल्याचे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प, त्यासाठी भूसंपादन आदी कामांसाठी ९५० कोटींची तरतूद आहे.

मोनो रेल्वे प्रकल्प ठरला पांढरा हत्ती
मोनो रेल्वे प्रकल्प एमएमआरडीएसाठी पांढरा हत्ती ठरला असून, त्या कामांवरही १३ कोटी २० लाख रुपये खर्च करावे लागतील. कोरोनामुळे गेली सहा महिने मोनो रेल्वे बंद असल्याने या खर्चात थोडी-फार कपात होणार आहे. एमएमआरडीएच्या दळणवळण आणि परिवहन विभागामार्फत माथेरान फ्युनिक्युलर रेल्वे, वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर प्रकल्पाचे संचालन, बीकेसी येथे सायकल ट्रॅक, सिग्नल फ्री जंक्शन, सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यानापर्यंत झुलता पूल, रोपवे आदी कामे मार्गी लावण्याचे नियोजन असून, त्यासाठी एक हजार १६ कोटींची तरतूद आहे. सूर्या आणि काळू प्रकल्पांसाठीही ४० कोटींच्या खर्चाचे नियोजन आहे.

मेट्रोमार्गिकांवर यंदाच्या आर्थिक वर्षात होणारा खर्च

मार्गिका क्रमांक खर्च (रुपये कोटींमध्ये)

दहिसर ते मानखुर्द- २ अ - ९१९ रु, खर्च
डीएननगर ते मंडाले- २ ब - ६००
वडाळा ते कासारवडवली- ४ - १२८७
कासारवडवली ते गायमुख- ४ अ - १००
ठाणे-भिवंडी-कल्याण-५ - ३८४
स्वामी समर्थनगर ते विक्रोळी-६ - ८०३
अंधेरी ते दहिसर-७ - १०२२
दहिसर ते मीरा-भार्इंदर-९ - ५००
गायमुख ते शिवाजी चौक- १० - ५८
वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- ११ - ५६
कल्याण ते तळोजा- १२ - ४६
घोडबंदर ते विरार-१३ - ५४
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The highest cost will be incurred on Metro-4 this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.