राज्याची भट्टी झालीय; जळगाव ४५.४ अंश सेल्सिअस
By सचिन लुंगसे | Updated: May 24, 2024 19:05 IST2024-05-24T19:04:27+5:302024-05-24T19:05:14+5:30
मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील.

राज्याची भट्टी झालीय; जळगाव ४५.४ अंश सेल्सिअस
मुंबई : मुंबईसह राज्यभरात नोंदविण्यात येणा-या कमाल तापमाने नागरिकांचा जीव काढला असून, शुक्रवारी तर जळगाव येथे कमाल तापमानाची नोंद ४५.४ अंश सेल्सिअस झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर असले तरी वाढती आर्द्रता मुंबईकरांना घामाघूम करत असून, मुंबईकरांची रात्रही दिवसाइतकीच उष्ण नोंदविण्यात येत आहे.
मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील. दुपारी आणि सायंकाळी आकाश निरभ्र राहील. विदर्भातील जिल्हयांत तुरळक ठिकाणी वादळी पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील जिल्हयांत उष्णतेची लाट राहील. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्हयांत वादळी पाऊस पडेल.
कुठे किती तापमान
जळगाव ४५.४
परभणी ४३.५
छत्रपती संभाजी नगर ४३.४
बीड ४३.४
नांदेड ४२.८
मालेगाव ४२.८
जेऊर ४२
अहमदनगर ४१
सोलापूर ४०.६
धाराशीव ३९.९
नाशिक ३८.७
अलिबाग ३७.४
मुंबई ३४.६
पालघर ३६.४
ठाणे ३६.४
कमी दाबाचे क्षेत्र
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात केरळनजीक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, वाऱ्याचा प्रवाह यामुळे मान्सूनसाठी मजबूत होऊ शकतो.
- कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, पुणे, भारतीय हवामान शास्त्र विभाग
मान्सून रखडणार
जोपर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र अस्तित्वात असेल तोपर्यंत मान्सूनची प्रगती रखडणार. केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार नाही. परंतु हे कमी दाबाचे क्षेत्र या आठवड्याच्या अखेरीस ओसरण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मान्सूनची प्रगती पुन्हा सुरू होईल.
- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक
मान्सूनला खोळंबा
चांगल्या परिणामाची शक्यता २० टक्के तर वाईट परिणामाची (मान्सूनच्या वाटचालीला खोळंबा) शक्यता ८० टक्के जाणवेल.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
विजेची मागणी ४ हजार १५६
वाढत्या गर्मीपासून सुटका करण्यासाठी एसी, कुलर आणि पंखे वेगाने फिरत आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढत आहे. शुक्रवारी मुंबईत विजेची मागणी ४ हजार १५६ मेगावॉट नोंदविण्यात आली. टाटा पॉवरकडून १ हजार २० तर बेस्टकडून ९२१ मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला.