खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 10:22 IST2024-08-02T10:22:06+5:302024-08-02T10:22:29+5:30
नरेश म्हस्के व अन्य २२ जणांना समन्स बजावत २ सप्टेंबरला सुनावणी ठेवली.

खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते राजेंद्र विचारे यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने गुरुवारी शिंदे गटाचे नेते व ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या २२ उमेदवारांना गुरुवारी समन्स बजावले. नरेश म्हस्के यांची निवडणूक रद्दबातल ठरवावी आणि आपल्याला विजयी उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी मागणी राजन विचारे यांनी याचिकेद्वारे केली आहे.
राजन विचारे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्या. रियाझ छागला यांच्या एकलपीठापुढे युक्तिवाद केला. ‘नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांना दंगली प्रकरणात दोषी ठरविल्याचे लपवले, असे याचिकेत म्हटले आहे. ठाणे मतदार संघातून म्हस्के यांना ७ लाख ३४ हजार २३१ मते मिळाली, तर राजन विचारे यांना ५ लाख १७ हजार २२० मते मिळाली. निवडणूक याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया राजन विचारे यांनी पार पाडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक याचिकेवर सुनावणी घ्यावी, अशी विनंती खंबाटा यांनी केली. न्यायालयाने खंबाटा यांचे म्हणणे ऐकून घेत नरेश म्हस्के व अन्य २२ जणांना समन्स बजावत २ सप्टेंबरला सुनावणी ठेवली.