विमानतळावर ८४ कोटींचे हेरॉइन जप्त, महिला प्रवाशाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 07:45 IST2023-02-16T07:45:33+5:302023-02-16T07:45:57+5:30
डीआरआयची कारवाई, महिला प्रवाशाला अटक

विमानतळावर ८४ कोटींचे हेरॉइन जप्त, महिला प्रवाशाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हरारे येथून नैरोबीमार्गे मुंबईविमानतळावर दाखल झालेल्या एका महिला प्रवाशाकडून ११.९४ किलो वजनाच्या हेरॉइनची तस्करी पकडण्यात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना यश आले आहे. या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल ८४ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी या महिलेसह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केनिया एअरलाईन्सच्या विमानाने मुंबईत येणाऱ्या एका महिलेकडे अंमली पदार्थ असल्याची ठोस माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर संबंधित महिला बाहेर पडण्याच्या बेतात होती, त्याचवेळी अधिकाऱ्यांनी तिच्या सामानाची झडती घेतली. या झडतीत तिच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगेच्या बाजूच्या कप्प्यात रंगीत खडे असल्याचे आढळून आले. त्याची चाचणी केली असता ते हेरॉइन असल्याचे निष्पन्न झाले. हरारे येथील एका व्यक्तीने मुंबईतील दोघांना देण्यासाठी हे सामान आपल्याला दिल्याचे या महिलेने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. हे अंमली पदार्थ त्या महिलेकडून घेण्यासाठी विमानतळ परिसरात दोघेजण आले होते. या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे या दोन व्यक्तींनादेखील डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.