Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो सर.. परीक्षा पुढे ढकलणार का? फोनवर विद्यार्थ्यांकडून समुपदेशकांसमोर प्रश्नांची सरबत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 13:02 IST

राज्य शिक्षण मंडळाप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ही राज्यात ४०९ प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मुंबई :  ‘सर.. अभ्यास पूर्ण झाला नाही, परीक्षा पुढे ढकलल्या जाणार का? यंदा परीक्षा दिली नाही तर चालेल का? प्रश्नपेढीतील किती व कोणते प्रश्न परीक्षेला येतील?’ असे एक ना अनेक डोकं भंडावून सोडणारे प्रश्न आणि विनंत्या विद्यार्थी समुपदेशकांना करीत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे बारावीच्या वर्गातील असले तरी दहावीच्या पालक व विद्यार्थ्यांकडूनही बरेच फोन येत असल्याची माहिती समुपदेशक देत आहेत. 

राज्य शिक्षण मंडळाप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ही राज्यात ४०९ प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण आल्यास किंवा शंका निरसनासाठी विद्यार्थी या समुपदेशकांना संपर्क करू शकणार आहेत. मुंबईत ३५, पूर्व मुंबईत १, उत्तर मुंबईत ११, दक्षिण मुंबईत ९, मुंबई उपनगरात १७ तर पश्चिम मुंबईत १५ समुपदेशकांची नोंदणी करण्यात आली आहे. मुलं सध्या प्रचंड तणावाखाली असून, त्यांची मानसिक परिस्थिती ढासळली आहे. त्यांना परीक्षांमध्ये कमी गुण मिळतील, अशी भीती वाटत आहे, अशी माहिती समुपदेशक स्मिता शिपूरकर यांनी दिली. आतापर्यंत त्यांनी १५० हून अधिक मुलांचे समुपदेशन केले असून, मुले २० ते २५ मिनिटे आपल्या समस्या आणि अडचणी सांगतात, असे त्यांनी म्हटले.  

विद्यार्थ्यांच्या तक्रारी - अभ्यास झाला नाही, सराव झाला नाही, तर परीक्षा रद्द होणार का ?- ऑनलाइन शिक्षण समजलेच नाही, लिखाण मंदावले आहे, त्यामुळे पेपर वेळेत पूर्ण होणार नाही. - २५ टक्के अभ्यासक्रम कमी झाला; पण ७५ टक्क्यांमधील नेमकं काय करायचं, ते शाळेकडून व्यवस्थित कळलेच नाही. - ऑनलाइन वर्ग झाले तर परीक्षा ऑनलाइन का नाही ?- आम्ही आता पास होण्यासाठी नेमका कोणता अभ्यास करू ? - आमचे अजूनही असाइनमेंट जमा करून घेतले नाही, मग आम्हाला गुण मिळतील का ? 

मोबाइल सुटेना, अभ्यासात मन लागेना  परीक्षा तोंडावर आल्या असल्या तरी हातातील मोबाइल न सुटल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून, त्यांच्या अभ्यासाची पद्धत समजावून घेऊन त्यांना अभ्यास कसा करावा, हे मार्गदर्शन केले जाते. अनेकदा त्यांना व्यायाम, योगा, ध्यान करण्यास ही सूचविले जाते.  -स्मिता शिपूरकर, समुपदेशक (एससीईआरटी), एच. के. गिडवानी हायस्कूल, मुलुंड  

टॅग्स :विद्यार्थीपरीक्षाशाळा