‘हॅलो मी, दया नायक बोलतोय...’; डिजिटल अरेस्ट करून महिलेची फसवणूक, ४ लाख केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:08 IST2025-07-31T08:05:19+5:302025-07-31T08:08:00+5:30
रश्मी शुक्ला यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांची नावे पुढे करत महिलेला कथित डिजिटल अरेस्ट करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

‘हॅलो मी, दया नायक बोलतोय...’; डिजिटल अरेस्ट करून महिलेची फसवणूक, ४ लाख केले लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सहायक पोलिस आयुक्तपदी बढती मिळून मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त होण्याच्या वाटेवर असलेले चकमकफेम पोलिस अधिकारी दया नायक यांच्या नावाचा वापर करून सायबर ठगांनी घाटकोपरमधील महिलेला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवून चार लाख लंपास केले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घाटकोपरमध्ये राहणारी ही महिला खासगी कंपनीत नोकरी करते. १९ जुलैला तिला अनोळखी नंबरवरून व्हॉट्स ॲप कॉल आला. कॉल करणाऱ्याने तो दिल्ली पोलिस युनिटमधून बोलत असल्याची बतावणी केली. आधारकार्डचा गैरवापर होत असून अनेक बँक खाती उघडली आहेत. त्यातून बेकायदा व्यवहार होत आहेत, असे त्याने सांगितले.
महिलेने त्याला जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी करते, असे सांगितले. पण, त्याने पोलिस अधिकारी दया नायक आणि प्रमोद वर्मा साहेब व्हिडिओ कॉलवर तुमच्याशी बोलणार असल्याचे सांगत तिला व्हिडिओ कॉल केला. पोलिसांचा युनिफॉर्म घालून बसलेले दोघेजण तिला दिसले. त्यांनी महिलेच्या आधारकार्डचा वापर आरोपी नरेश गोयल याच्या केसमध्ये होत असल्याचे सांगून तिला आणखी घाबरविले. व्हिडिओ कॉल चालूच ठेवायला सांगत या प्रकरणात पोलिस आणि बँक मॅनेजरही सामील असल्याचे तिला भासवले. पुढे, रश्मी शुक्ला यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांची नावे पुढे करत महिलेला कथित डिजिटल अरेस्ट करण्यात आली.