रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:11 IST2025-07-21T08:10:46+5:302025-07-21T08:11:01+5:30
कोस्टलवरील वाहतुकीला हवाई वाहतुकीचीही जोड देऊन मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट उभारता येते का, याचा विचार प्रशासनाने सुरू केला.

रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
भूषण गगराणी
आयुक्त, मुंबई महानगरपालिका
कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या धावत्या आयुष्याला नवा वेग मिळाला आहे. या वेगाला हवाई वाहतुकीची जोड देऊन वाहतुकीचे मल्टिमॉडेल प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या बांधणीदरम्यान वरळी डेअरीसमोर तात्पुरत्या २ जेट्टी बांधण्यात आल्या होत्या. यातील एक जेट्टी अमरसन्स गार्डनजवळ बांधली होती, जी नंतर पाडण्यात आली आणि दुसरी वरळीत बांधण्यात आली होती. वरळी जेट्टीच्या जागेत हेलिपॅड तयार करून मुंबईच्या वाहतुकीला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे वाहतूक सक्षम होईलच शिवाय आवश्यकता भासल्यास रुग्णांच्या स्थलांतरासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनातही याचा उपयोग होऊ शकणार आहे.
नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी कोस्टल रोड टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत उभारण्यात आला आहे.
हेलिपॅडबाबतची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे कोस्टलवरील वाहतुकीला हवाई वाहतुकीचीही जोड देऊन मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट उभारता येते का, याचा विचार प्रशासनाने सुरू केला.
दक्षिण मुंबईत मोठी रुग्णालये आहेत. अनेकदा रुग्णांच्या स्थलांतरासाठी एअर ॲम्ब्युलन्स वापरल्या जातात, मात्र त्या विमानतळावर उतरवून रुग्णांना तेथपर्यंत न्यावे लागते. हेलिपॅड झाल्यास रुग्णांना एअर ॲम्बुलन्सची सेवा काही मिनिटांत देता येईल.
जेट्टीवर हेलिपॅड बांधण्याबाबत सल्लागारानेही सकारात्मक अहवाल दिला आहे. त्यामुळे यापुढील प्रक्रियाही सुरू केल्या आहेत. यामध्ये नागरी संस्था गृहविभाग, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) संरक्षण मंत्रालय आणि कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) प्राधिकरणासह प्रमुख नियामक प्राधिकरणांकडून मंजुरी मिळवावी लागणार आहे.
कोस्टलमुळे जी ७० हेक्टरची मोकळी जागा उपलब्ध होणार आहे, तेथे मोठे लँडस्केप गार्डन आणि सुविधा देण्यात येत आहेत. यात मुंबईकरांना ७.५ किमीचा प्रॉमिनाड (विहारपथ) आणि मोठा सायकल ट्रॅकही खुला होणार आहे. प्रियदर्शनी पार्कपासून सुरू होणाऱ्या या विहारपथाला आणि सायकल ट्रॅकबाबत मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे. आज अनेक रस्त्यांवर चालायला फुटपाथच शिल्लक नसताना एवढा मोठा विहारपथ आणि २.४ मीटर रुंद असा सुरक्षित सायकल ट्रॅक मुंबईकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. प्रियदर्शनी पार्कपासून ते वरळीपर्यंत जवळपास ११ जागी या प्रवेशासाठी जागा देण्यात येणार आहेत.
मुंबईत एवढा मोठा आणि सलग असा एकमेव सायकल ट्रॅक ठरणार आहे. बेस्ट बससाठी ६ बस थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्यांनाही इथे फेरफटका मारणे शक्य होईल. एकंदर कोस्टल रोड सर्वार्थाने मुंबईकरांसाठी पर्यटन केंद्र ठरणार आहे.