Mumbai: जेएनपीए बंदरातील अवजड वाहतूक कोलमडली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:43 IST2025-09-02T14:41:20+5:302025-09-02T14:43:36+5:30
मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या आंदोलनामुळे पाच दिवसांपासून अटल सेतूवरील वाहतूक बंद करण्यात आली.

Mumbai: जेएनपीए बंदरातील अवजड वाहतूक कोलमडली!
मधुकर ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण: मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या आंदोलनामुळे पाच दिवसांपासून अटल सेतूवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईत धडकले आहे. दरम्यान, अटलसेतूवरून आझाद मैदानावर जाणाऱ्या मराठा आंदोलकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जेएनपीए बंदरातून देशभरातील ये-जा करणारी कंटेनर वाहतूकही सध्या ठप्प झाली.
मराठा आंदोलकांना मुंबईकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच जेएनपीए व उरण परिसरातील विविध रस्त्यांवर आदेशानुसार, अवजड वाहनांना विविध मार्गांवर रोखण्यात आले होते. त्यामुळे हजारो अवजड वाहने ठिकठिकाणी रस्त्यावर अडकली आहेत. सध्या दास्तान फाटा ते चिर्ले व चिर्ले ते दिघोडे दरम्यानच्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत असली तरी अटल सेतूवरील वाहतूक चार दिवसांपासून पूर्णपणे बंद केल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी दिली.
न्हावा-शेवामध्ये पोलिसांकडून प्रयत्न
मराठा आंदोलनादरम्यान जेएनपीए परिसरातील अवजड वाहतूक वरिष्ठांच्या आदेशानुसार रोखण्यात आली हाेती. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत सुरू करण्यात आली असल्याची माहिती न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली.
दररोज १६ हजार कंटेनरची वर्दळ
मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका जेएनपीएला बसला आहे. गुरुवारी जेएनपीए बंदरातील अवजड कंटेनरची वाहतूक २५ टक्के ठप्प झाली होती. दररोज बंदरातून देशभरात सुमारे १६ हजार कंटेनरची ये-जा होते. जेएनपीएअंतर्गत असलेल्या पाचही बंदरातील कंटेनर वाहतूक ५५ टक्क्यांपर्यंत कोलमडली होती. आता हळूहळू ती पूर्व पदावर येत असल्याची माहिती जेएनपीएचे अधिकारी एस. के. कुलकर्णी यांनी दिली.