Heavy rains slow down Mumbai's speed, heavy in Thane too | मुसळधार पावसामुळे मंदावला मुंबापुरीचा वेग, ठाण्यातही जोरदार

मुसळधार पावसामुळे मंदावला मुंबापुरीचा वेग, ठाण्यातही जोरदार

मुंबई : मुंबई शहर, उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. विशेषत: मुंबई शहरासह उपनगरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत अतिवृष्टी झाली नसली तरी दिवसभर संततधार असल्याने मुंबईकरांना काहीसा मनस्ताप झाल्याचे चित्र होते. विशेषत: समुद्रकिनारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उसळलेल्या ४.५७ मीटर उंचीच्या लाटांनी काही काळ का होईना, मुंबापुरीला धडकी भरवली होती.

कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, भायखळा, गिरगाव, दादर, माहिम, वरळीसह सायन, माटुंगा, विलेपार्ले, मरोळ, अंधेरी, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकीनाका, पवई, घाटकोपर, विद्याविहार, बोरीवली, कांदिवली, भांडुप या परिसरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी १२नंतर पाऊस काहीसा कमी झाला होता. मात्र पुन्हा तीन वाजता पावसाचा वेग वाढला. पावसाचा वेग कमी असल्याने सखल भाग वगळता अन्य ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र रस्ते वाहतुकीसह मुंबापुरीचा वेग मंदावला होता. पावसामुळे ३८ ठिकाणी झाडे कोसळली. २ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.

कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी पडत राहतील. शनिवारी पडलेल्या पावसामुळे मुंबईत ४ ठिकाणी घराचा भाग पडला. ३२ ठिकाणी झाडे कोसळली. १० ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.
हाय अलर्टमुळे यंत्रणा सज्ज
मुंबई महापालिकेने सर्व २४ विभाग कार्यालयांसह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क, सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले होते. सर्व विभाग नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट दिला होता. याशिवाय ६ उदंचन केंद्रे सुसज्ज होती. २९९ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविलेले पाण्याचा उपसा करणारे संच तयार होते. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना मदतीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विद्युत पुरवठा करणाºया बेस्ट उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मिठीच्या पातळीत वाढहोत असल्यास क्रांतीनगर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली.बेस्टचा मार्ग बदललासायन रोड नंबर २४, हिंदमाता, शिवडी, गांधी मार्केट, वांद्रे येथे पाणी साचल्याने बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले होते.

ठाणे जिल्ह्यात १२४.५६ मिमी पाऊस
ठाणे : हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टच्या अंदाजानुसार शुक्रवारपेक्षा शनिवारी सकळापासूनच ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. मागील २४ तासांत जिल्ह्यात १२४.५६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर ठाणे शहर परिसरात संध्याकाळपर्यंत सर्वाधिक १२०.६८ मि.मी. पाऊस पडला. मात्र, लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने घराबाहेरील जनजीवनावर या पावसाचा फारसा परिणाम जाणवला नाही.
सकाळी मानकोलीजवळ बस आणि कारचा अपघात झाल्याने मुंबई -नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. तर मुसळधार पावसामुळे ठाणे आणि कळवा स्थानकातील रूळ पाण्याखाली गेल्याने आपत्कालीन सेवांसाठी सुरू असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली होती. दिवसभरात ठाणे शहरात १२ ठिकाणी पाणी साचले होते. जिल्ह्यात ठाण्यासह कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण भागात वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. एक-दोन ठिकाणी भिंतीही पडल्याच्या घटना घडल्या.

रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट
रायगड : जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवार, ४ जुलै ते ७ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेट अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सकाळपासूनच पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. त्यातच आज समुद्राला उधाण आल्याने समुद्रालगतची गावे आणि शहरातील सखल भागांमध्ये पाणी तुंबल्याचे चित्र होते. पुढील कालावधीत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई, पालघरला आज आॅरेंज अलर्ट
५ जुलै रोजी पालघर जिल्ह्याला आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

नवी मुंबईत चार वृक्ष कोसळले
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे नागरिकांनीही घरातच थांबणे पसंत केले. सायंकाळपर्यंत ९६ मि.मी. पाऊस पडला. बेलापूरमध्ये १०२, नेरुळमध्ये ११९, वाशीमध्ये ७ १, कोपर खैरणेमध्ये ९१ व ऐरोलीमध्ये १११ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे चार वृक्ष कोसळल्याची नोंद झाली आहे. महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास व अग्निशमन दलासही दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असून त्यांनी स्वत: आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

तलाव क्षेत्रात पावसाने उघडले खाते
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन वाढले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये अवघा सात टक्के जलसाठा शिल्लक आहे. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासून कोसळणाºया मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रातही खाते उघडले आहे.
मुंबईकरांना दररोज तीन हजार आठशे दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसली नाही. मात्र मान्सून वेळेत दाखल झाल्यानंतरही संपूर्ण जून महिना कोरडा गेला. यामुळे तलावात जमा असलेला जलसाठा सध्या जुलै अखेरीपर्यंत मुंबईची तहान भागवू शकणार आहे.

मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर साठा असणे अपेक्षित असते. ४ जुलै रोजी शनिवारी तलावांमध्ये एक लाख नऊ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला तलाव क्षेत्रात चांगल्या पावसाला सुरुवात होऊन एक लाख ७३ हजार ९१३ दश लक्ष लीटर जलसाठा वाढला होता. शुक्रवारपासून पावसाने तलाव क्षेत्रातही हजेरी लावली आहे. शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू राहिल्यामुळे तलाव क्षेत्रात जलसाठा वाढू लागला आहे.

अप्पर वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक लीटर पाणी
मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी
५० दशलक्ष क्युबिक लीटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी दिली. मुंबईला पाणी पुरविणाºया अप्पर वैतरणा आणि भातसा धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याने महापालिकेने राज्य सरकारकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त पाणीपुरवठा केला जाणार आहे.

येथे साचले पाणी
हिंदमाता, वडाळा येथील शक्कर पंचायत रोड, धारावी क्रॉस रोड, काळाचौकी येथील सरदार हॉटेल, माटुंगा येथील एसआयईएस कॉलेज, भायखळा पोलीस ठाणे, चेंबूर पुलाखाली, चेंबूर रेल्वे स्थानक, अंधेरी सबवे, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज.

१३२.२ मि.मी. पावसाची नोंद
मुंबई शहर आणि उपनगरात शनिवार सकाळपासून पडणाºया पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली. मात्र दुपारनंतर वाºयाच्या वेगाने सुरूझालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने मुंबापुरीला अक्षरश: झोडपून काढले. दरम्यान, शनिवारी रात्री ८.३० वाजेदरम्यान मुंबईत तब्बल १३२.२ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली.

पालघर-वसईत शेतकरी सुखावले
पालघर : मागील एक महिना लांबणीवर पडलेल्या पावसाने शुक्रवारपासून दमदार हजेरी लावली. त्यामुळे तीन महिने ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेले व उष्म्याने हैराण झालेले शहरवासी तसेच शेतकरी सुखावले आहेत. वसई-विरार शहरातही शुक्रवारी रात्रीपासून धरलेली संततधार दुसºया दिवशीपर्यंत कायम राहिली. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Heavy rains slow down Mumbai's speed, heavy in Thane too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.