Heavy rains increase water storage by 13 days, increase of 51,685 million liters in the lake | मुसळधार पावसाने वाढला १३ दिवसांचा जलसाठा, तलावात ५१ हजार ६८५ दशलक्ष लीटरची वाढ

मुसळधार पावसाने वाढला १३ दिवसांचा जलसाठा, तलावात ५१ हजार ६८५ दशलक्ष लीटरची वाढ

मुंबई : जून महिना कोरडा गेल्यानंतर मुंबईवर चिंतेचे ढग जमा झाले होते. मात्र वीकेंडला जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने दिलासा दिला. शहराला दररोज पाणीपुरवठा करणाºया सात तलावांमध्ये ४८ तासांत ५१ हजार ६८५ दशलक्ष लीटर म्हणजेच १३ दिवसांचा जलसाठा जमा झाला.  
मुंबईला रोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असल्यास वर्षभराचा पाणीप्रश्न मिटतो. जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये शनिवारी केवळ आठ टक्के जलसाठा शिल्लक होता. तूर्तास पालिका प्रशासनाने पाणी कपातीबाबत निर्णय घेतलेला नाही. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढून एक लाख ६० हजार ६९२ दशलक्ष लीटर झाली. सर्वाधिक म्हणजे ३८ हजार २०८ दशलक्ष लीटरची वाढ ही भातसा धरणात झाली. तर, तानसा तलावात दोन हजार २२१ दशलक्ष लीटर आणि अप्पर वैतरणा तलावातील जलसाठ्यात कोणतीही वाढ नोंदविण्यात आली नाही. गेल्या वर्षी याच काळात तलावांमध्ये दोन लाख १६ हजार ५२२ दशलक्ष लीटर एवढा जलसाठा होता.

सलग तीन दिवस कोसळलेल्या मान्सूनची अखेर विश्रांती


मुंबई : सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसाने आज अखेर म्हणजे सोमवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार विश्रांती घेतली. मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी सकाळपासून पाऊस विसावला होता. कुठे तरी अधूनमधून कोसळणारी सर वगळता बहुतांश ठिकाणी किंचित का होईना, सूर्यनारायणाचे दर्शन होत होते. असे असले तरी रविवारी दिवसासह रात्री आणि सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत तब्बल ११६.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
मुंंबई शहरात १ ते ५ जुलैपर्यंत १७०.४ मिमी. पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात या वेळी मात्र ३९१.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस १३० टक्के आहे. मुंबईच्या उपनगराचा विचार करता येथे १ ते ५ जुलै या काळात सर्वसाधारण १७६.६ मिमी पावसाची नोंद होते. यंदा ३८५.१ मिमी म्हणजे ११९ टक्के पाऊस पडला.
दुपारी ४ नंतर झोडपधारा;
वेगाने वाहिले वारे
मुंबईत दुपारी मान्सून विश्रांतीवर होता. दुपारी ३ नंतर त्याने पुन्हा जोर धरला. विशेषत: मुंबईच्या पश्चिम उपनगरात सोसाट्याचा वारा सुटला. ढगांनी काळोख केला. चारनंतर पूर्व उपनगरासह पश्चिम उपनगरात झोडपधारेला सुरुवात झाली. बोरीवली, कांदिवली, मालवणी, मालाड, चिंचोळी या परिसरात दुपारी ४ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत
४० मिमी.पर्यंत पावसाची नोंद
झाली. मध्य मुंबई, दक्षिण मुंबई
येथे मात्र ५ ते २० मिमी. पावसाची नोंद झाली. तुरळक ठिकाणी
कोसळलेल्या मुसळधारांनी सायंकाळी ६ नंतर जोर कमी केला, मात्र वारे वेगाने वाहत होते.

पावसामुळे पडझडीच्या घटना घडत असतानाच सहा ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. ८९ ठिकाणी झाडे कोसळली. ३१ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.

भांडुप संकुल येथे विहार तलावात रविवारी संध्याकाळी सात वाजता एक मुलगा बुडाल्याची घटना घडली.

अग्निशमन दलासह पोलीस, नौदलाच्या पाणबुड्यांना घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Heavy rains increase water storage by 13 days, increase of 51,685 million liters in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.