मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, मध्य आणि हार्बर लोकल सेवेला मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 11:20 IST2023-07-19T11:18:53+5:302023-07-19T11:20:28+5:30
मुंबई आणि उपनगरांत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, मध्य आणि हार्बर लोकल सेवेला मोठा फटका
मुंबई-
मुंबई आणि उपनगरांत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची लाइफ लाइन असलेल्या लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं या दोन स्थानकांदरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. अंबरनाथ ते सीएसएमटी लोकल सेवा १५ ते २० मिनिटं उशीराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेचाही वेग मंदावला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेल येथे ९ वाजून ४० मिनिटांनी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे बेलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुंबईत पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावर सांताक्रूझ ते वांद्रे येथे ट्राफिक पाहायला मिळत आहे. तर अंधेरी सबवेमध्येही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मिलन सबवे आणि खार सबवे सध्या सुरळीत सुरू आहेत. मुंबई शहरात ४७.४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात ५०.०४ मिमी आणि पश्चिम उपनगर - ५०.९९ मिमी. इतकी नोंद झाली आहे.