मुसळधार पावसाने मुंबई तुंबली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 07:03 AM2020-09-24T07:03:35+5:302020-09-24T07:03:49+5:30

सखल भागांत साचले पाणी; जलमय परिसरातून मार्ग काढताना दमछाक

Heavy rains flooded Mumbai | मुसळधार पावसाने मुंबई तुंबली

मुसळधार पावसाने मुंबई तुंबली

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी मुंबई तुंबली. मंगळवारी मध्यरात्रीसह बुधवारी पहाटे पावसाचा जोर कायम राहिल्याने रस्ते, रेल्वे आणि ठिकठिकाणी पाणी साचले. याचा विपरीत परिणाम रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवर झाला. दोन्ही सेवा कोलमडल्या. शिवाय अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. सकाळच्या वेळेस कार्यालय गाठणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाºयानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून बुधवारी सकाळीच मुंबईतल्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने
केले होते. शिवाय नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही केले होते. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार मुंबईत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

च्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बुधवारी सकाळी वरळी सी-फेससोबत पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी नालेसफाई १०० टक्के झाल्याचा दावादेखील केला.
च्दरम्यान, सखल भागात साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांची दमछाक झाली. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी बेस्ट बसच्या मार्गातही बदल करण्यात आला.

दामोदर हॉल पाण्याखाली
मध्य मुंबईत बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. विशेषत: माटुंगा, परळ, दादर परिसरात साचलेल्या पाण्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. परळ येथील दामोदर हॉलमध्येदेखील पावसाचे पाणी साचल्याचे चित्र होते. मध्य मुंबईतील बहुतांश परिसरात विशेषत: झोपडट्टी, चाळींना पावसाचा मोठा फटका बसला.


वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलली
मुंबई, ठाणे व पालघरमधील मुसळधार पावसामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाची बुधवारची लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केला. ही परीक्षा केव्हा होणार, हे नंतर कळवले जाईल. हा विषय सोडून उर्वरित विषयांची लेखी परीक्षा ही पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होईल.

येथे साचले पाणी
दादर टीटी सर्कल, परळ, सायन रोड नंबर २४, नानाचौक, हिंदमाता, बावला कम्पाउंड, गोल देऊळ, मुंबई सेंट्रल, श्रीराम जंक्शन वडाळा, वरळी सी-फेस, लोट्स जेट्टी वरळी, बेहराम बाग जंक्शन, शक्कर पंचायत चौक, चुनाभट्टी, कुर्ला क्रांतीनगर, मालाड सबवे, दहिसर सबवे, मिलन सबवे, मानखुर्द सबवे येथे पाणी साचले होते. तर हिंदमाता, गांधी मार्केट, सायन रोड क्रमांक २४, वडाळा ब्रिज, किंग्ज सर्कल, भाऊ दाजी रोड, खोदादाद सर्कल, मडकेबुवा चौक, कुर्ला डेपो, शीतल सिनेमा, शेल कॉलनी, कल्पना सिनेमा, मालाड सबवे, एस.व्ही. रोड, अंधेरी मार्केट, शास्त्री नगर, ओबेरॉय मॉल, मिलन सबवे, वाकोला येथे बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती.
आजही मुसळधार
मुंबई शहर आणि उपनगराला बुधवारी झोडपून काढलेल्या पावसाचा वेग गुरुवारीदेखील कायम राहणार आहे. २४ सप्टेंबर रोजी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २५ सप्टेंबर रोजी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्याचा विचार केल्यास २४ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. २५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Heavy rains flooded Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस