लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून शनिवारीही अनेक भागांना पावसाने झोडपल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात सलगच्या पावसामुळे शिवारात पाणी साचले आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही वाढ होताना दिसत आहे.
अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असतानाच सलग पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. लातूर जिल्ह्यात सातत्याने जोरदार पाऊस होत आहे. शनिवारी पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तीन बॅरेजेस भरले आहेत. तसेच ११ बॅरेजेसमध्ये ५० टक्के जलसाठा ठेवून अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले आहे. ३४.७ हेक्टरवरील फळबागेस फटका बसला आहे. त्यामुळे खरीप हंगामपूर्व कामात व्यत्यय आला आहे.
सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना दक्ष राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहर आणि तालुक्यात शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यात एका ८० वर्षांच्या महिलेचा गोठा अंगावर पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना ताकमोगे वस्तीवर घडली.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे सोहळे (ता.आजरा) येथे भुईमुगाच्या पिकात पाणी साचल्याने चिखलातून काढणी सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमाेरी तालुक्यात उन्हाळी धान पीक वादळ वाऱ्यामुळे आडवे झाले आहे. परभणी जिल्ह्यात उन्हाळी भुईमूग काढणे अशक्य झाले. अनेक शेतकऱ्यांना भुईमूग वाळवता देखील आला नाही. त्यामुळे पिकाची माती झाली आहे. कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यात प्रवाहासोबत आलेल्या माशांची पुन्हा पाण्यात जाण्यासाठी धडपड.