मुंबईत मुसळधार! अतिजोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा कायम; सर्व यंत्रणा अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 03:34 PM2020-07-04T15:34:40+5:302020-07-04T15:37:00+5:30

पावसाची संततधार सुरू असल्यानं मुंबापुरीचा वेग मंदावला

Heavy rain in mumbai IMD issues red Alert | मुंबईत मुसळधार! अतिजोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा कायम; सर्व यंत्रणा अलर्टवर

मुंबईत मुसळधार! अतिजोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा कायम; सर्व यंत्रणा अलर्टवर

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : मुंबई शहर उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. विशेषत: मुंबई शहरासह उपनगरात पावसाने चांगलाच जोर पकडला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अद्याप तरी मुंबईत अतिवृष्टी झाली नसली तरी दुपारपर्यंत लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना काहीसा मनस्ताप झाल्याचे चित्र होते. विशेषत: समुद्र किनारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उसळलेल्या ४ मीटर उंचीच्या लाटांनी काही काळ का होईना मुंबापुरीला धडकी भरवली. 

कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधून मधून जोरदार सरी पडत राहतील. काही ठिकाणी अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  पाऊस कोसळत असतानाच ३८ ठिकाणी झाडे कोसळली. २ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, भायखळा, गिरगाव, दादर, माहीम, वरळीसह सायन, माटुंगा, विलेपार्ले, मरोळ, अंधेरी, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकीनाका, पवई, घाटकोपर, विद्याविहार, बोरिवली, कांदिवली, भांडुप या परिसरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. दुपारनंतर मात्र पाऊस काहीसा कमी झाला होता. पावसाचा वेग कमी असल्याने सखल भाग वगळले तरी फार काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र रस्ते वाहतूकीसह मुंबापुरीचा वेग मंदावला होता.  

सर्व यंत्रणा हाय अलर्टवर

- सर्व २४ विभाग कार्यालयांसह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क, सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत.

- जेणेकरून काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ आवश्यक ती कार्यवाही अंमलात आणता येईल. 

सर्व विभाग नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

- ६ उदंचन केंद्रे सुसज्ज असून २९९ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित राहतील.

- राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे.

- विद्युत पुरवठा करणा-या बेस्ट उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व पर्यायी बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले.

- मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

गेल्या २४ तासांचा पाऊस/मिमीमध्ये
कुलाबा १६९
सांताक्रूझ १५७

४ जुलैपर्यंतचा एकूण पाऊस/ मिमीमध्ये
कुलाबा ७८६
सांताक्रूझ ५७९.३

२०२० पावसाची टक्केवारी
कुलाबा ३४.२९
सांताक्रूझ २१.७१

मनपाच्या स्वयंचलित केंद्रावरचा २४ तासांतील पाऊस (मिमी)
शहर १०१.८१
पूर्व उपनगर ८४.२५
पश्चिम उपनगर ९४.७८

Web Title: Heavy rain in mumbai IMD issues red Alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.