तो आला! मनासारखा धो धो बरसला, पाणी तुंबूनही नागरिकांमध्ये समाधानाची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 03:06 AM2019-06-29T03:06:31+5:302019-06-29T03:07:42+5:30

या वेळी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आणि पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबापुरी केली.

heavy Rain in Mumbai | तो आला! मनासारखा धो धो बरसला, पाणी तुंबूनही नागरिकांमध्ये समाधानाची भावना

तो आला! मनासारखा धो धो बरसला, पाणी तुंबूनही नागरिकांमध्ये समाधानाची भावना

Next

मुंबई - आज येणार, उद्या येणार, आता परवा तर नक्कीच येणार; या आशेवर मुंबईकर मान्सूनची वाट पाहत राहिले. जून महिन्याचे अखेरचे दिवस सुरू झाले तरीदेखील पावसाचा काही पत्ताच नव्हता. परिणामी, आता काही पाऊस पडत नाही, असे म्हणत मुंबईकरांनी पावसाला जुलैमध्येच घालवले. दोन ते तीन दिवसांत मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज दोन दिवसांपूर्वीच हवामान खात्याने दिल्यानंतरही त्यास मुंबईकरांनी फार काही गांभीर्याने घेतले नाही. मात्र या वेळी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आणि पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबापुरी केली.

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे चार महिने तापदायक उन्हाने मुंबईकरांना घाम फोडल्यानंतर जून महिन्यात वेळेवर मान्सून दाखल होईल आणि दिलासा मिळेल, अशी आशा मुंबईकरांना होती. प्रत्यक्षात मात्र मान्सून विलंबाने दाखल झाला आणि जून महिनाही उन्हाळ्याप्रमाणेच गेला. सरतेशेवटी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने दमदार एन्ट्री केली.

२८ जून रोजी मुंबईत सकाळपासून वेगाने सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांना धडकी भरली. २४ जून, मंगळवारी मान्सून दाखल झाल्यापासून पाऊस बेपत्ताच होता. शुक्रवारी सकाळी सुरू झालेला पहिला पाऊस फार काही जोर धरणार नाही, असे चित्र असतानाच झाले काही भलतेच. हो हो म्हणता दुपारी अडीच वाजेपर्यंत चर्चगेटपासून दहिसरपर्यंत आणि फोर्टपासून मुलुंडपर्यंत ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने मुंबईकरांच्या नाकीनऊ आणले.

अधूनमधून विश्रांतीवर जाणारा पाऊस एकदम मध्येच वेगाने दाखल होत असल्याने मुंबईकरांची तारांबळ उडत होती. विशेषत: सखल भागात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे सेवेसह बेस्ट बससेवा विस्कळीत झाली होती. हवामान खराब असल्याने विमानसेवेलाही फटका बसला. ऐन सकाळी वाहतूककोंडीत सापडलेल्या मुंबईकरांना पहिल्या पावसाचे कौतुक करावे की त्याच्या नावाने बोटे मोडावीत; हेच समजत नव्हते. सकाळपासून सुरू झालेला पाऊस दुपारी बारापर्यंत धो धो कोसळत होता. दुपारी बारानंतर पावसाचा जोर जरा कमी झाला असला तरी अडीच वाजेपर्यंत ठिकठिकाणी त्याचे बरसणे सुरूच होते. त्यानंतर मात्र पावसाचा कमी झालेला वेग रात्री उशिरापर्यंत कायम असल्याचे चित्र होते.

हवामान खात्याचे अपडेट
मुंबई हवामान खाते अपडेट होत असून, आजच्या पहिल्या पावसादरम्यानच हवामान खात्याने आपल्या अत्याधुनिक कामाची चुणूक दाखविली.
मुंबईच्या हवामान खात्याकडून मुंबईकरांना तासागणिक पावसाचा अंदाज दिला जात होता.
महत्त्वाचे म्हणजे पुढच्या एक तासासह चार तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथे कसा पाऊस पडेल, याची माहिती हवामान खात्याद्वारे दिली जात होती.

प्रवाशांनी पाण्यातून चालत गाठले स्थानक

मुंबई : हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल स्थानकाजवळील पादचारी पूल पालिकेने बंद केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना लांबचा पल्ला गाठून रेल्वे स्थानक गाठावे लागते. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून
पाणी वाहत होते. त्यामुळे प्रवाशांना या पाण्यातून वाट काढत स्थानक गाठावे लागले.
किंग्ज सर्कल स्थानकाजवळील दोन पादचारी पूल धोकादायक असल्याने १३ जून रोजी बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवासी रस्ता ओलांडून स्थानकावर जातात.

पहिल्या पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाप्रमाणेच हार्बर मार्गावरही परिणाम झाला. लोकल उशिराने धावत होत्या.

Web Title: heavy Rain in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.