मुंबईत मुसळधार! सखल भागांत पाणी साचलं, अंधेरी सबवे बंद; हार्बर सेवा विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 15:36 IST2023-07-21T15:34:00+5:302023-07-21T15:36:59+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईत मुसळधार! सखल भागांत पाणी साचलं, अंधेरी सबवे बंद; हार्बर सेवा विस्कळीत
मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. किंग्ज सर्कल, सायन सर्कल, चुनाभट्टी, मालाड, घाटकोपर येथे पाणी साचलं असल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईची लाइफ असलेल्या लोकल सेवेच्या हार्बर लाइनवर परिणाम झाला आहे. हार्बर रेल्वेच्या कुर्ला स्थानकात पाणी साचल्यानं वडाळा ते मानखुर्द लोकल सेवा बंद झाली आहे. मानखुर्द ते पनवेल सेवा सुरू आहे. तसंच मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सध्या सुरळीत सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतुकी १५ ते २० मिनिटं उशीराने सुरु आहे.
उपनगरातंही तुफान पाऊस असून अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवेमध्ये २ ते ३ फुट पाणी साचलं आहे. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे पश्चिम द्रूतगती महामार्गावरील वाहतूकही मंदावली आहे. बोरीवलीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाकडूनही मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.