Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:54 IST

Mumbai School Heartwarming photos: मुंबईत सोमवारपासून महापालिकेसह इतर शिक्षण संस्थांच्या शाळा सुरू झाल्यात.

मुंबई: मुंबईत सोमवारपासून महापालिकेसह इतर शिक्षण संस्थांच्या शाळा सुरू झाल्यात. नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली. शिक्षण राज्यमंत्री प्रकाश भोयर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ  यांनी स्वतः  शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 

अनेक लोकप्रतिनिधींनीही विविध शाळांमध्ये भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कुठे विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी टोप्या देऊन, कुठे शालेय वस्तूंचे वितरण करून तर कुठे फुले, रांगोळ्या आणि गाणी यांच्या माध्यमातून मुलांचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला. मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरांतील सर्वच  शाळांमध्ये विशेष सजावट करण्यात आली होती. मुलांना वह्या, पेन, खोडरबर, रंगीत पेन्सिली यांसारख्या वस्तू भेट देण्यात आल्या. काही ठिकाणी स्वागताच्या  फलकांसह मुलांची नावे लिहून त्यांचे कौतुक करण्यात आले. 

शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी वांद्रे येथील खेरवाडी महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तर देऊन त्यांचे स्वागत केले. बोरीवली (पश्चिम) येथील पोयसर महानगरपालिका शाळेत आयुक्त  भूषण  गगराणी यांनी विद्यार्थ्यांना खास टोप्या दिल्या.  त्यामुळे विद्यार्थी आनंदित झाले. बहुतांश शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी भिंतीवर लिहिलेल्या ‘हसत खेळत शिका’ या घोषवाक्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. 

काही ठिकाणी जोकरसुद्धा मुलांचे स्वागत करीत होता. त्यामुळे मुलांना मोठी मज्जा वाटली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी  नृत्य, वादन सादर करून  करून वातावरण भारून टाकले. पालक भारावले पहिल्या दिवशीचा हा जल्लोष पाहून पालकही भारावून गेले. शाळांमध्ये पुन्हा मुलांचा गोंगाट, उत्साह आणि किलबिलाट सुरू झाल्याचा आनंद शिक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.

"महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या टोप्या आयुक्तांनी बालकांना भेट दिल्या. विद्यार्थी खूप भारावून गेले", असे महानगरपालिकेच्या अधिकारी प्राची जांभेकर यांनी म्हटले. तर, चेंबूर येथील रहिवासी लता कांबळे म्हणाल्या की, "पहिल्या दिवशीच मनपा शाळेत मुलांचे खूप छान स्वागत झाले. शाळेने सर्व व्यवस्था केली होती. मुलांना चॉकलेट व  दप्तर मिळाले. स्वागतासाठी रांगोळीसुद्धा  काढली होती."

टॅग्स :शाळामुंबईमहाराष्ट्र