Join us  

हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर २७ जूनला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 4:24 PM

Navneet Rana and Ravi Rana :माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देऊ नये अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हनुमान चालिसावरून वक्तव्ये केली आहेत. यामुळे त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. 

मुंबई : हनुमान चालिसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जामीन अटींचा भंग केल्याप्रकरणी जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने २७ जूनला सुनावणी ठेवण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला होता. पुन्हा अशाप्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला वेठीस धरू नये, पोलिसांना तपासात सहकार्य करावे आणि पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देऊ नये अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हनुमान चालिसावरून वक्तव्ये केली आहेत. यामुळे त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. 

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी नवनीत राणा यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. याविरोधात सोमवारी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. लिलावतीमधून डिस्चार्ज मिळताच नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले होते. हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले. 

मी कोणता गुन्हा केला ज्याची मला शिक्षा मिळाली. क्रूर बुद्धीने महिलेवर, लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्यात आली. माझ्यावर जो अन्याय झाला, तुरुंगात ते पोलीस ठाण्यात त्यावर मी लवकरच बोलणार आहे. एवढा अत्याचार केला, तुमच्याकडे ताकद आहे म्हणून. लोकांसमोर येऊन तुम्ही निवडणूक लढवून दाखवा. महिलेची ताकद काय आहे हे मी दाखवून देईन. महाराष्ट्राची जनता माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे उत्तर देईल. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने लढा देणार आहे, असे शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले होते. 

टॅग्स :न्यायालयनवनीत कौर राणापोलिससत्र न्यायालयरवी राणा