घरापासून ८ किमीच्या आत आरोग्य सेवा; पल्स वैद्यकीय परिषदेत CM देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 05:42 IST2026-03-28T05:42:45+5:302026-03-28T05:42:51+5:30
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) चा प्रभावी वापर करण्यावर शासनाचा भर

घरापासून ८ किमीच्या आत आरोग्य सेवा; पल्स वैद्यकीय परिषदेत CM देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, या सेवा नागरिकांच्या निवासस्थानापासून आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) चा प्रभावी वापर करण्यावर शासनाचा भर असून, यामुळे आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवताना गुणवत्ताही टिकवून ठेवता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. पल्स वैद्यकीय परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
वैद्यकीय क्षेत्राला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय ‘पल्स वैद्यकीय परिषद २०२६’ वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे.
उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू उपस्थित होते.
परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास राज्य सक्षम : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यातील आरोग्य क्षेत्र उपचारकेंद्रित पद्धतीकडून प्रतिबंधात्मक दृष्टिकोनाकडे, तसेच पारंपरिक व्यवस्थेकडून तंत्रज्ञानाधारित सेवेकडे वेगाने वाटचाल करत आहे. या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास राज्य सक्षम आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘पल्स वैद्यकीय परिषद २०२६’ ही केवळ परिषद नसून, महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनाचा रोडमॅप आहे.
ग्रामीण-शहरी दरी कमी होणार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले, डिजिटल आरोग्य बळकट करणे, ग्रामीण-शहरी दरी कमी करणे आणि महाराष्ट्राला जागतिक वेलनेस केंद्र बनविण्याच्या दिशेने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रोबोटद्वारे शस्त्रक्रिया
परिषदेत बेरियाट्रिक सर्जन डॉ मुफ्फजल लकडावाला यांनी नागपूर येथे आलेल्या रुग्णाची रोबोटला सूचना देऊन शस्त्रक्रिया केली. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शासन ग्रामीण भागातही वैद्यकीय सेवा पुरवेल. या परिषदेत वैद्यकीय शिक्षण, विशेष उपचार सेवा, मनुष्यबळ विकास, आरोग्य तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील अनेक सामंजस्य करार आणि गुंतवणूक प्रस्ताव होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.