भायखळा कारागृहात कैद्यांची तब्येत सुधारणार; आजारी कैद्यांसाठी ६ स्वतंत्र सेल, अत्याधुनिक किचन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 09:12 IST2025-10-06T09:12:01+5:302025-10-06T09:12:26+5:30
विभागाच्या इमारतीचे उद्घाटन अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके यांच्या हस्ते संपन्न झाले.

भायखळा कारागृहात कैद्यांची तब्येत सुधारणार; आजारी कैद्यांसाठी ६ स्वतंत्र सेल, अत्याधुनिक किचन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा जिल्हा कारागृहात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वयंपाकगृह आणि तृतीयपंथीय, आजारी कैद्यांसाठी ६ स्वतंत्र सेलचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर निधीतून या नव्या सुविधा उभारल्या आहेत. यात नवीन स्वयंपाकगृह, स्टोअर रूम, गॅस सिलिंडर रूम, कोल्ड स्टोरेज रूम, आधुनिक मॉड्युलर किचन उपकरणांचा समावेश आहे.
या विभागाच्या इमारतीचे उद्घाटन अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके यांच्या हस्ते संपन्न झाले.
स्थापना १८४० मधील; राज्यातील सर्वांत जुने कारागृह
विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, भायखळा कारागृहाचे अधीक्षक विकास रजनलवार, वरिष्ठ तुुरुंगाधिकारी आनंद टेंगले, तुरुंगाधिकारी अमृता दशवंत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, काही बंदी उपस्थितीत होते. भायखळा कारागृहाची स्थापना १८४० साली झाली असून, हे महाराष्ट्रातील सर्वांत जुने कारागृह मानले जाते.
आरोग्यदायी आहार मिळणार
सध्या येथे सुमारे ९०० ते १,००० पुरुष, महिला कैदी आणि ६ वर्षांपर्यंतच्या वयाची लहान मुले वास्तव्यास आहेत. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने अन्न तयार करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे बंद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नव्या स्वयंपाकगृहाची उभारणी केली आहे. यामुळे जेवण अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि जलद होणार आहे.