Join us  

अल्पसंख्याक समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार व मुख्यमंत्र्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:00 PM

अबू आसिम आझमी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील सक्रिय व्यक्तींची बैठक 

 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे अल्पसंख्याक समाजातील विविध प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व त्यांच्या सोबत होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी लवकरच मुस्लिम समाजातील सक्रिय व्यक्तींचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत असलो तरी महाविकास आघाडी मात्र अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून असा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असा इशारा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी दिला. 

राज्यातील मुस्लिम समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यासाठी इस्लाम जिमखानामध्ये नुकतीच मुस्लिम समाजातील स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधींसोबत बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.  या बैठकीला आमदार कपिल पाटील,आमदार रईस शेख  मौलाना खालिद अशरफी, मौलाना असद कासमी, मौलाना अनीस अहमद, अंजुमन खैरुल इस्लाम के डॉ. अब्दुल्ला,अँड मुबीन सोलकर, मोहम्मद तबरेज़, सलीम कोडिया, असलम गाझी, अब्दुल सलाम सलफ़ी, मौलाना ज़ाकिर उपस्थित होते.  तब्लिग जमातच्या काही जणांवर लावण्यात आलेले 304 व 307 कलम  त्वरित हटवावे, लॉकडाऊनमध्ये राज्यात आठशे ते हजार मशीदीमध्ये  ध्वनिक्षेपकावरील अझान बंद करण्यात आली ती पूर्ववत करावी,  एनआरसीसी सीएए आंदोलकांविरोधातील सर्व केसेस मागे घ्यावेत. बकरी ईदच्या कुर्बानीसाठी मुंबईत विविध ठिकाणी बकऱ्यांच्या बाजाराला परवानगी मिळावी,  सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने वीज, पाणी पुरवठा व मालमत्ता कर माफ करण्यात यावा,  अशा मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :सामाजिकपाणीमहाराष्ट्र