तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:14 IST2025-12-31T12:12:15+5:302025-12-31T12:14:35+5:30
इलेक्ट्रिक बस चालवण्याचा फक्त तीन महिन्यांचा अनुभव चार जणांचे जीव घेऊन गेला,

तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
मुंबई : भांडूप स्टेशन रोडवर बेस्टच्या इलेक्ट्रिक एसी बस अपघातप्रकरणी भांडूप पोलिसांनी बेस्ट बसचालक संतोष रमेश सावंत (५२) याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक केली. बस चालवायला बसलो तेव्हा ती चालू स्थितीत उभी होती. हॅण्ड ब्रेक काढताच बस जंप होऊन हा अपघात घडला, असा दावा सावंतने पोलिस चौकशीमध्ये केला.
प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने सावंतला ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपी सावंत अपघात घडला तेव्हा दारूच्या नशेत नव्हता, असे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल्याचे पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी सांगितले. सावंत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील १०५ (सदोष मनुष्यवध), ११०(सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न), १२५ अ (स्वतःसह इतरांच्या जिवाला धोका होईल अशी कृती) आणि मोटारवहन कायद्यातील १८४ (धोकादायकरीत्या वाहन चालवणे) या कलमानुसार भांडूप पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
नेमकी चूक कुणाची?
अपघातग्रस्त बस विक्रोळी डेपोला जोडलेली एक वेट-लीजवरील इलेक्ट्रिक एसी बस होती. त्या बसची तज्ज्ञांकडून तांत्रिक तपासणी, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शीचे जबाब, बस वाहकाचे जबाब, आधी बस उभी करून गेलेल्या चालकाचा जबाब नोंद करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बेदरकारपणे चालवल्याचा रमेश सावंतवर ठपका
बेस्टमध्ये २००८ पासून चालक असलेले सावंत हे पर्मनंट आहेत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी इलेक्ट्रिक बस चालविण्यास सुरुवात केली. घटनेच्या दिवशी रात्री ते कर्तव्यावर हजर झाले. बसस्थानकावर थांबलेल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याची जाणीव असताना आणि आपल्या कृत्यामुळे प्रवाशांची जीवितहानी होईल हे माहीत असतानादेखील आरोपी बसचालक सावंत याने त्याचे ताब्यातील बेस्ट बस बेदरकारपणे चालवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.