Join us  

‘तो’ पदाधिकारी बांगलादेशीच, तपासात आले सत्य समोर; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 1:23 AM

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती 

मुंबई : भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्यांक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार मला प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून, चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी याची तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. रुबेल हा भाजपाचा पदाधिकारी असून या पक्षाने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसे दिले. बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाज विघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का? असा प्रश्नसुद्धा तपासे यांनी उपस्थित केला होता. तसेच ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशमुख यांना देण्यात आले होते.

यासंदर्भात देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी याचा तपास केला असता चौकशीदरम्यान त्यांच्या घरात पश्चिम बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा-२४ उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवासी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा-नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखल मिळाला होता. चौकशी केली असता, रुबेल जोनू शेख या नावाचा कोणताही रहिवासी दाखला देण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आली.

दाखल्यात नोंद असलेली शाळाच अस्तित्वात नाही

जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया, पश्चिम बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता रुबेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कुणाच्या तरी नावावर असल्याचे समोर आले. जिल्हा शाळा निरीक्षकांकडील रेकॉर्ड तपासल्यावर सदर दाखल्यामध्ये नमूद केलेली बोलगंडा आदर्श हायस्कूल ही शाळाच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. 

टॅग्स :भाजपाअनिल देशमुखमहाराष्ट्र