‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद, वन विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 02:12 IST2019-12-27T02:12:19+5:302019-12-27T02:12:47+5:30
वन विभागाची कारवाई : सीप्झ एमआयडीसी परिसरात होता वावर

‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद, वन विभागाची कारवाई
मुंबई : अंधेरी पूर्वेकडील सीप्झ येथील एमआयडीसीमधील वेरावली जलाशय व केंद्र शासनाच्या कार्यालयाच्या आवारात काही दिवसांपासून वावरणाऱ्या नर बिबट्याला वनविभागाने गुरुवारी पहाटे जेरबंद करून त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. या बिबट्याने श्वानावर हल्ला केला होता, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
अंधेरी परिसरात दिवसा वनविभागाचे वनपाल यांच्यासह रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पथक यांच्यामार्फत दररोज पाहणी करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली जात होती. तसेच आजूबाजूच्या मानवी वस्तीत बिबट्याविषयी ठाणे वनविभागातील कर्मचारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कर्मचारी व मुंबईकर फॉर एसजीएनपी या संघटनेकडून जनजागृती केली जात होती. तसेच बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅपिंग लावून बिबट्याच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात होती.
बिबट्या ज्या ठिकाणी आढळत होता तेथील परिसर दाट मानवी वस्तीचा आहे. परिसरात बिबट्यापासून कोणतीही जीवितहानी होऊ नये, म्हणून बिबट्याला जेरबंद करून त्याच्या मूळ अधिवासात सोडणे आवश्यक होते. त्याकरिता नागपूर येथून प्रधान मुख्य वनसंरक्षक यांची परवानगी घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. २६ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला. बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले, अशी माहिती ठाणे वनविभागाचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी सीप्झ परिसरातून बिबट्याने श्वानावर हल्ला करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. म्हणून बिबट्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंग करण्यात आले होते. हा बिबट्या वेरावली जलाशयाच्या परिसरात यायचा, असे निदर्शनास आले होते. बिबट्याचे वास्तव्य हे आरे कॉलनीमधलेच आहे. आरे कॉलनीमध्ये एक टीम वर्षभर कॅमेरा ट्रॅपिंग करत असते.
- मयूर कामत, मानद वन्यजीव रक्षक