Andheri Crime News: मायानगरी मुंबईतील अंधेरी परिसरात एका २२ वर्षीय विद्यार्थिनीवर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून आलेल्या एका अज्ञात नराधमाने घरात घुसून तरुणीला लुटले आणि तिचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आल्याने तिचा जीव वाचला. या घटनेमुळे मरोळ परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
चेहऱ्यावर पेपर फाईल अन् हातात चाकू
पीडित तरुणी विलेपार्ले येथील एका नामांकित महाविद्यालयात एमएससीचे शिक्षण घेत आहे. ती मरोळ येथील घरात आपल्या वडिलांसोबत राहते. ३० डिसेंबरच्या संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ती घरी एकटीच असताना आरोपीने घराची बेल वाजवली. आरोपीने आपला चेहरा एका तपकिरी रंगाच्या पेपर फोल्डरने झाकला होता आणि त्याने गळ्यात बनावट ओळखपत्र घातले होते.
वडिलांच्या एका फोनमुळे टळला मोठा अनर्थ
सुरुवातीला आरोपीने पार्सल देण्याच्या बहाण्याने तिला दरवाजा उघडण्यास सांगितले. तरुणीला संशय आल्याने तिने वडिलांना फोन करून पार्सल मागवले आहे का, अशी विचारणा केली. वडिलांनी नकार देताच तिने पार्सल घेण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी तिथून निघून गेला, पण तो केवळ २० मिनिटांत पुन्हा परतला. यावेळी त्याने जबरदस्तीने घरात प्रवेश करून तरुणीला चाकूचा धाक दाखवला.
बेडरूममध्ये खेचत नेलं, गळा दाबून केलं बेशुद्ध
आरोपीने तरुणीकडून २ हजार रुपयांची रोकड लुटली आणि तिला मारहाण करत बेडरूममध्ये खेचत नेले. तिथे त्याने तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला, ज्यात ती शुद्ध हरपून खाली पडली. तरुणीने आरडाओरडा केल्यामुळे सोसायटीतील लोक जमा झाले, हे पाहून आरोपीने तिथून पळ काढला. जखमी तरुणीला तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे वय २० ते २३ वर्षांच्या दरम्यान असून तो स्थानिक परिसरातील असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
Web Summary : In Andheri, a fake delivery boy robbed and choked a student. Neighbors intervened, saving her life. Police are investigating the incident.
Web Summary : अंधेरी में एक फर्जी डिलीवरी बॉय ने एक छात्रा को लूट लिया और गला घोंट दिया। पड़ोसियों ने हस्तक्षेप कर उसकी जान बचाई। पुलिस मामले की जांच कर रही है।