जुगारात हरलेले उधारीचे पैसे परत करण्यासाठी बनला चोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:27 IST2025-07-28T12:26:39+5:302025-07-28T12:27:21+5:30

माटुंगा पोलिसांनी अटक केलेल्या दोन साखळीचोरांपैकी एकाची कबुली.

he became a thief to return the money he lost in gambling | जुगारात हरलेले उधारीचे पैसे परत करण्यासाठी बनला चोर

जुगारात हरलेले उधारीचे पैसे परत करण्यासाठी बनला चोर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऑनलाइन जुगारात हरलेल्या सात लाख रुपयांची उधारी परत करण्यासाठी एका तरुणाने चोरीचा मार्ग पत्करल्याची माहिती समोर आली आहे. माटुंगा पोलिसांनी सोनसाखळी हिसकावण्याच्या प्रकरणात या आरोपीला अटक केली आहे. 

अटक केलेल्या दोन  आरोपींच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. या आरोपींचा इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबतही माटुंगा पोलिस अधिक तपास करीत आहेत. माटुंगा पोलिसांच्या हद्दीत १९ जुलै रोजी जैन मंदिरातून घरी जाणाऱ्या विजया हरिया (७४) यांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या या दोघा जणांनी हिसकावली होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल करत, माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी तपास सुरू केला. या प्रकरणी कुर्ला पश्चिमेकडे राहणाऱ्या मोहीम अशोक संगिशेट्टी (२२) आणि रोहित ओमसिंह गौंड (१९) या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. दोघांनीही महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले असून, सध्या दोघेही बेरोजगार होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सात लाख रूपये घेतले उसने

यातील मोहितला ऑनलाइन जुगाराचा नाद होता. यात स्वतःचे बँक खाते रिकामे झाल्यानंतर, त्याने मित्र आणि नातेवाइकांकडून पैसे उसने घेतले. त्यांचेही जवळपास ७ लाख रुपये तो ऑनलाइन जुगारात हरला होता. त्याच्या अन्य गुन्ह्यातील सहभागाबाबत पोलिस तपास करत आहे.

दुचाकीसह चोरीचे सोने जप्त

उसने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा मित्र, नातेवाइकांनी लावल्याने आपण सोनसाखळी चोरी करून पैसे परत करण्याचे ठरवले. त्यासाठी रोहितला हाताशी घेतले, असे मोहिमने सांगितले. आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी आणि ९.८० ग्रॅम वजनाची  सोन्याची लगड पोलिसांनी जप्त केली.

 

Web Title: he became a thief to return the money he lost in gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.